पाकचा पुन्हा गोळीबार; १९ गावांवर भडिमार
By Admin | Updated: August 25, 2014 04:05 IST2014-08-25T04:05:49+5:302014-08-25T04:05:49+5:30
पाकिस्तानी सैनिकांनी जम्मू सेक्टरच्या आंतरराष्ट्रीय सीमेवरील २५ सुरक्षा चौक्या आणि १९ गावांवर शनिवारी संपूर्ण रात्रभर तोफगोळे डागले.

पाकचा पुन्हा गोळीबार; १९ गावांवर भडिमार
जम्मू : पाकिस्तानी सैनिकांनी जम्मू सेक्टरच्या आंतरराष्ट्रीय सीमेवरील २५ सुरक्षा चौक्या आणि १९ गावांवर शनिवारी संपूर्ण रात्रभर तोफगोळे डागले. याच पट्ट्यात तुफान गोळीबार करून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याची आगळीक पाकिस्तानने पुन्हा एकदा केली आहे. त्यास सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी गोळीबाराने प्रत्युत्तर दिले.
शनिवारी रात्री ८ वाजेपासून जम्मू जिल्ह्यातील अरनिया आणि आरएस पुरा भागातील सीमा चौक्या आणि नागरी वसाहतींवर स्वयंचलित शस्त्रांनी तुफान गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानी रेंजर्सनी उखळी तोफांचा माराही केला, अशी माहिती बीएसएफच्या अधिकाऱ्याने दिली. या हल्ल्यात कोणतीही प्राणहानी झाल्याचे वृत्त नसले तरी तीन गुरांचा यात मृत्यू झाला. काही गावांतील लोकांना आधीच सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्यामुळे प्राणहानी टळली. रविवारी सकाळी ७.३० वाजेपर्यंत दोन्ही बाजूंकडून गोळीबार सुरूच होता, असे या अधिकाऱ्याने सांगितले.
चकमकीत एक जवान शहीद कुपवाडा जिल्ह्यातील नियंत्रण रेषेलगत रविवारी उडालेल्या सशस्त्र चकमकीत चार दहशतवाद्यांना ठार मारले. यात एक जवान शहीद झाला. नीरज कुमार असे त्याचे नाव आहे. (वृत्तसंस्था)