तेलंगणच्या ब्रँड अँम्बेसेडरपदी पाकची सूनबाई नको
By Admin | Updated: July 24, 2014 12:40 IST2014-07-24T12:13:03+5:302014-07-24T12:40:07+5:30
सानिया मिर्झा ही पाकिस्तानची सून असून तिला तेलंगणचे ब्रँड अॅम्बेसेडरपद द्यायला नको असे सांगत भाजपने सानियाला विरोध दर्शवला असून काँग्रेसनेही याविषयी भाजपच्या सूरात सूर मिसळले आहे.

तेलंगणच्या ब्रँड अँम्बेसेडरपदी पाकची सूनबाई नको
ऑनलाइन टीम
हैद्राबाद, दि. २४- टेनिसपटू सानिया मिर्झाला तेलंगणच्या ब्रँड अँम्बेसेडरपदी नियुक्त करण्यावरुन वाद निर्माण झाला आहे. सानिया मिर्झा ही पाकिस्तानची सून असून तिला ब्रँड अॅम्बेसेडरपद द्यायला नको असे सांगत भाजपने सानियाच्या नियुक्तीला विरोध दर्शवला आहे. विशेष म्हणजे काँग्रेसनेही भाजपच्या सूरात सूर मिसळत सानियाला विरोध दर्शवला आहे. स्वतंत्र तेलंगण लढ्याला सानियाने कधीही पाठिंबा दिला नसून तिच्याऐवजी अन्य कोणालाही ब्रँड अँम्बेसेडरपदी नेमावे अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे.
टेनिसपटू सानिया मिर्झाचा जन्म महाराष्ट्रात झाला असून तिच्या लहानपणाीच मिर्झा कुटुंब हैद्राबाद येथे स्थायिक झाले होते. टेनिसमध्ये भारताचे नाव रोशन करणा-या सानिया मिर्झाने २०१० मध्ये पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक याच्याशी लग्न केले. लग्नानंतरही सानिया भारतातर्फेच टेनिस खेळत असून शोएब मलिकनेही याला कधीही विरोध दर्शवललेला नाही. तेलंगण राज्याची स्थापना झाल्यावर तेलंगणमधील सत्ताधारी पक्ष तेलंगण राष्ट्र समितीने सानिया मिर्झाला राज्याच्या ब्रँड अँम्बेसेडरपदी नियुक्त केले आहे. २२ जुलैरोजी या संदर्भातील औपचारिक घोषणाही करण्यात आली होती. मात्र तेलंगण सरकारचा हा निर्णय आता वादाच्या भोव-यात सापडला आहे.
भाजपचे तेलंगणमधील नेते के. लक्ष्मण म्हणाले, सानिया मिर्झाचा जन्म महाराष्ट्रात झाला व १९८६ पासून ती हैद्राबाद येथे राहत आहे. त्यामुळे ती स्थानिक नाही. आता ती पाकिस्तानची सून अाहे. आगामी काळात होणा-या महापालिका निवडणुकांमध्ये अल्पसंख्यांक मतदारांना आकर्षित करण्यासाठी टीआरएसने सानियाची नेमणूक केली असा आरोपही लक्ष्मण यांनी केला आहे. काँग्रेसनेही याविषयी भाजपची साथ दिल्याचे दिसते. तेलंगणमधील काँग्रेस खासदार हनुमंतराव म्हणाले, सानिया पाकची सून असल्याने आमचा तिला विरोध नाही. पण ती तेलंगणसाठी कधी लढली नाही. तिच्याऐवजी मोहम्मद अझरुद्दीन किंवा अन्य कोणत्याही खेळाडूची अँम्बेसेडर म्हणून नेमावे.
टीआरएसच्या खासदार के. कविता यांनी या नियुक्तीचे राजकारण करु नये असे आवाहन केले आहे. सानिया आंतरराष्ट्रीय खेळाडू असून तिच्यामुळे तेलंगणला आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःची ओळख निर्माण करता येईल असेही कविता यांनी सांगितले. राज्य सरकारचा निर्णय योग्यच आहे असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, यावादाविषयी सानिया मिर्झा ट्विटरवर ट्विट केले आहे. 'ज्या लोकांना दुस-यांच्या आनंदामुळे दुःख होते त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो' असा टोला तिने या ट्विटमधून लगावला आहे.