पाकमध्ये समोरासमोर लढण्याची हिंमत नाही - मोदी
By Admin | Updated: August 12, 2014 12:41 IST2014-08-12T12:06:21+5:302014-08-12T12:41:25+5:30
पाकिस्तानकडे समोरासमोर लढण्याची हिंमत नसल्याने ते दहशतवादी हल्ल्यांच्या माध्यमातून छुपे युद्ध करत आहेत, अशा शब्दांत नरेंद्र मोदींनी पाकला खडे बोल सुनावले.

पाकमध्ये समोरासमोर लढण्याची हिंमत नाही - मोदी
ऑनलाइन टीम
लेह, दि. १२ - पाकिस्तानकडे समोरासमोर युद्ध करण्याची हिंमत नाही म्हणून दहशतवादी हल्ल्यांच्या माध्यमातून त्यांचे छुपे युद्ध सुरू आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानकडून होणा-या हल्ल्यांची निर्भत्सना केली. मंगळवारी लेह - लडाख येथे आलेल्या मोदींनी लष्कर व वायुदलाच्या जवानांना उद्देशून केलेल्या भाषणादरम्यान पाकिस्तानवर हल्लाबोल केला.
युद्धापेक्षा अशा प्रकारच्या दहशतवादी हल्ल्यांमुळे लष्कराच्या जवानांचे अधिक नुकसान होते, असे सांगत त्यांनी पाकच्या कृत्याचा निषेध केला.
जवानांना अत्याधुनिक शस्त्रास्त्रे देण्यास देश कटिबद्ध आहे, असेही मोदी यांनी सांगितले. तसेच संपूर्ण देश आपल्या पाठीशी उभा आहे, असा विश्वास जवानांना वाटला पाहिजे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, मोदींच्या लेह - लडाखच्या दौ-यापूर्वीच श्रीनगरजवळील पामपोर येथे बीएसएफच्या पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याने ८ जवान जखमी झाले. बीएसएफच्या १५१ बटालियनच्या जवानांचे पथक श्रीनगरमधील कँपच्या दिशेने निघाले असता दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. ज्यात आठ जण जखमी झाले असून त्यांच्यावर लष्कराच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.