ऑपरेशन सिंदूरनंतरपाकिस्तान बिथरला आहे. पाकिस्तानभारताच्या अनेक भागांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी सतत हल्ला करत आहे, परंतु आपल्या एअर डिफेन्स सिस्टमसमोर त्यांचे सर्व नापाक प्रयत्न अपयशी ठरत आहेत. याशिवाय पाकिस्तानकडून सोशल मीडियावर भारताशी संबंधित अनेक खोटी माहिती पसरवली जात आहे. 'पीआयबी फॅक्ट चेक' कडून सर्व प्रकारची खोटी माहिती आणि व्हिडिओंचे खंडन केले जात आहे.
सायबर हल्ल्याची खोटी बातमी
सोशल मीडियावर अलीकडेच व्हायरल होत असलेल्या खोट्या माहितीच्या दाव्याचं प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने खंडन केलं आहे. पीआयबीने अशा अफवांपासून दूर राहण्याचं आणि त्यावर विश्वास ठेवू नका असं आवाहन केलं आहे. व्हायरल झालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैन्याने सायबर हल्ल्याद्वारे भारताच्या ७०% पॉवर ग्रिडला इनएक्टिव्हेट केलं आहे. ही पोस्ट ग्लोबल डिफेन्स इनसाईट आणि डॉ. कमर चीमा नावाच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे.
हा दावा आहे खोटा
पोस्टमध्ये लिहिलं होतं की, पाकिस्तानने दिलेल्या माहितीनुसार, सायबर हल्ल्यामुळे भारताची ७० टक्के पॉवर ग्रिड ठप्प झाली आहे. 'पीआयबी फॅक्ट चेक' ने हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचं म्हटलं आहे.
पीआयबीने 'एक्स' वरील त्यांच्या अधिकृत अकाउंटवर पोस्ट केलं आणि म्हटलं की, 'सायबर हल्ल्याद्वारे पाकिस्तानने भारताच्या ७० टक्के पॉवर ग्रिडला इनएक्टिव्ह केल्याचा दावा पूर्णपणे खोटा आहे.' पीआयबीने जनतेला कोणत्याही प्रकारची माहिती फक्त अधिकृत सोर्सकडूनच मिळवण्याचं आवाहन केलं आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे सोशल मीडियावर खोट्या बातम्या, व्हिडीओ आणि माहिती शेअर केली जात आहे. पीआयबीने दिलेल्या माहितीनुसार, अशा बनावट बातम्या देशात अशांतता पसरवू शकतात. अशा परिस्थितीत त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. सरकार या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती रोखण्यासाठी सक्रिय पावलं उचलत आहे.