भारताच्या सैन्यशक्तीसमोर बिथरला पाकिस्तान! DGMO स्तराची बैठक बोलवून समेटासाठी प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2018 11:30 IST2018-01-17T10:36:40+5:302018-01-17T11:30:28+5:30
सीमेवर वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करणा-या पाकिस्तानला मागच्या काही महिन्यात भारतीय सैन्याने अनेकदा चांगलीच अद्दल घडवली आहे.

भारताच्या सैन्यशक्तीसमोर बिथरला पाकिस्तान! DGMO स्तराची बैठक बोलवून समेटासाठी प्रयत्न
नवी दिल्ली - सीमेवर वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करणा-या पाकिस्तानला मागच्या काही महिन्यात भारतीय सैन्याने अनेकदा चांगलीच अद्दल घडवली आहे. भारताच्या या धडक कारवाईचा पाकिस्तानने चांगलाच धसका घेतला असून पाकिस्तानमध्ये आता डीजीएमओ स्तराच्या बैठकीवर विचारविनमिय सुरु आहे. नियंत्रण रेषेवरील तणाव कमी करण्यासाठी भारताला डीजीएमओ स्तराच्या बैठकीचे निमंत्रण देण्यावर पाकिस्तानात विचार सुरु आहे.
सोमवारी पाकिस्तानी सिनेटच्या संरक्षण समितीच्या बैठकीत संरक्षण मंत्रालयाच्या अधिका-यांनी ही माहिती दिली. डॉन या पाकिस्तानी वर्तमानपत्राने दिलेल्या बातमीनुसार डीजीएमओ स्तराची बैठक घेण्यावर पाकिस्तान विचार करत आहे. पाकिस्तानकडून अद्यापपर्यंत तरी डीजीएमओ स्तराच्या बैठकीचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. असा प्रस्ताव आल्यास वरिष्ठ पातळीवर योग्य निर्णय घेतला जाईल असे इंडियन एक्सप्रेस दिल्लीतील सरकारी सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे.
पाकिस्तानकडून होणा-या प्रत्येक आगळीकीला भारतीय लष्कराकडून जोरदार प्रत्युत्तर मिळत आहे. दोन दिवसापूर्वीच भारतीय लष्कराने पूँछमध्ये धडक कारवाई करत पाकिस्तानी सैन्याच्या मेजरसह सात सैनिकांना यमसदनी धाडले होते. भारताने केलेल्या या कारवाईत पाकिस्तानचे चार सैनिकही जखमी झाले होते. सध्या पाकिस्तानला अफगाणिस्तान आणि भारत या दोन्ही सीमांवर लढावे लागत आहे. त्यामुळे पाकिस्तानवर दबाव वाढला आहे. त्यातून अमेरिकेचाही दबाव आहे त्यामुळे पाकिस्तान डीजीएमओ स्तराच्या बैठकीतून समेटाचा प्रयत्न करत आहे.
काय म्हणाले लष्करप्रमुख
दहशतवादी कारवायांनी ग्रासलेल्या काश्मीरमधील दहशवादाचा बिमोड करण्यासाठी लष्कराचे अभियान सुरूच राहील, असे संकेत लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत दिले आहेत. काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित झाली पाहिजे. मात्र त्यासाठी राजकीय पुढाकाराबरोबरच लष्करी अभियानही सुरू राहिले पाहिजे. तसेच सीमापलीकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी पाकिस्तानवर दबाव आणण्यासाठी लष्कराच्या आक्रमक कारवाईची गरज असल्याचेही लष्कर प्रमुखांनी ठणकावून सांगितले आहे.
पाकिस्तानमधून होणाऱ्या घुसखोरीबाबत काही दिवसांपूर्वी लष्करप्रमुखांनी पाकिस्तानकडून होणाऱ्या घुसखोरीच्या प्रयत्नांबाबत कठोर शब्दांत प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर पाकिस्तानकडून भारताला धमक्या देण्यास सुरुवात झाली होती. मात्र रविवारी एका विशेष मुलाखतीदरम्यान, लष्करप्रमुखांनी काश्मिरमधील परिस्थितीचा सामना करण्यासाठी लष्कराने नवी रणनीती आणि युद्धनीती विकसित करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.