India Pakistan News: भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे ९ अड्डे उडवले. दहशतवाद्यांवर केलेल्या कारवाईने पाकिस्तानचा थयथयाट सुरू झाला आहे. पाकिस्ताने ८ मे रोजी रात्री अचानक भारतीय लष्कराच्या तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. मध्यरात्रीपर्यंत हा लष्करी संघर्ष सुरू होता. भारतीय लष्कराने हे हल्ले परतवून लावले. पण, पाकिस्तानी लष्कराने थेट सीमेलगत असलेल्या गावांवरच उखळी तोफा डागल्या आणि अंदाधूंद गोळीबार केला. यामुळे मालमत्तेचं प्रचंड नुकसान झाले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पाकिस्तान लष्कराने गुरूवारी (९ मे) रात्री भारतीय लष्कराच्या तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. जम्मू, पठाणकोट, उधमपूर आणि इतर काही ठिकाणांवर पाकिस्तानी लष्कराने मिसाईल आणि ड्रोन हल्ले केले. पाकिस्तानच्या मिसाईल्स आणि ड्रोन भारतीय लष्कराने हवेतच नष्ट केल्या.
पाकिस्तानचा गावांवर गोळीबार, हल्ले
गुरुवारी अंधार पडल्यानंतर अचानक सायरन वाजण्यास सुरूवात झाली आणि वीज पुरवठा बंद करण्यात आला. पाकिस्तानी लष्कराने एकाच वेळी जम्मू आणि राजस्थानातील काही ठिकाणांवर मिसाईल आणि ड्रोन्स डागले. मात्र, त्यांचे हल्ले भारताने हाणून पाडले.
दरम्यान पाकिस्तानी लष्कराने जम्मूतील सीमेलगत असलेल्या गावांवर अंदाधूंद गोळीबार केला. उखळी तोफा डागल्या. पाकिस्तानकडून हल्ले होण्यापूर्वीच ही गावे रिकामी करण्यात आली होती. नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलातरीत करण्यात आले होते. त्यामुळे जीवितहानी झाली नाही, मात्र वित्तहानी प्रचंड झाली आहे.
पाकिस्तानचे गावांवर हल्ले, बघा व्हिडीओ
जम्मूमधील पुंछ जिल्ह्यात असलेल्या अजोटे गावात प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक घरांचे छत कोसळले आहे. अनेक घरात उखळी तोफ येऊन पडल्या आहेत.
पाकिस्तानने भारतीय लष्कराच्या छावण्यांवरच हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. यात जम्मू, पठाणकोट, उधमपूर, जैसलमेर, जालंधर आणि भूज यांचा समावेश आहे. जम्मूमध्येही उरी, अखनूर, आणि पुंछ जिल्ह्यात पाकिस्तानी लष्कराने गावांवर गोळीबार केला.
भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, जम्मू विमानतळ, सांबा, आरएस पुरा, अरनिया आणि आजूबाजूच्या भागातही पाकिस्तानकडून अनेक मिसाईल सोडण्यात आल्या होत्या. त्या एस ४०० डिफेन्स सिस्टिमने पाडण्यात आल्या. याचे आवाज ऐकायला आले.