S400 Defense System: पहलगाम हल्ल्याला ऑपरेशन सिंदूरद्वारे प्रत्युत्तर दिल्यानंतर पाकिस्तान बिथरला आहे. भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. त्यामुळे पाकिस्तानकडून पलटवार करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र त्याआधीच भारताने पाकिस्तानच्या हवाई संरक्षण यंत्रणेवर हल्ला करून ती उद्ध्वस्त केली आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर १५ भारतीय शहरांवर हवाई हल्ले करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न भारतीय हवाई दल आणि एस-४०० हवाई संरक्षण प्रणालीने पूर्णपणे हाणून पाडला. त्यामुळे एस-४०० हे भारताचे सुदर्शन कवच असल्याचे सिद्ध झाले आहे.
गुरुवारी सकाळी भारताने पाकिस्तानची हवाई संरक्षण प्रणाली नष्ट केली. बुधवारी रात्री उशिरा पाकिस्तानी सैन्याने १५ भारतीय लष्करी तळांवर हल्ला करण्याची योजना आखली होती. यानंतर भारतीय सैन्याने ही कारवाई करून प्रत्युत्तर दिले. संरक्षण मंत्रालयाने दुपारी अडीच वाजता ही माहिती दिली."७ मे च्या रात्री पाकिस्तानने उत्तर आणि पश्चिम भारतातील शहरांना लक्ष्य केले. यामध्ये अवंतीपोरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड, नल, फलोदी, उत्तरलाई आणि भुजमध्ये ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागण्यात आली," असं संरक्षण मंत्रालयाने म्हटले.
पाकिस्तानकडून क्षेपणास्त्रांचा वापर झाल्यास भारतीय लष्कराने आधीच रशियन बनावटीची एस-४०० हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली सीमेवर तैनात केली होती. क्षेपणास्त्रांचे हल्ले सुरु होताच ही प्रणाली सक्रिय झाली. पाकिस्तानकडून हे रॉकेट डागण्यात आले होते आणि एस-४००ने ते पाडले. त्यानंतर आज सकाळी, भारतीय सशस्त्र दलांनी हार्पी ड्रोनचा वापर करून पाकिस्तानमधील अनेक ठिकाणी असलेल्या पाकिस्तानच्या हवाई संरक्षण रडार आणि प्रणालींना लक्ष्य केले. लाहोर, सियालकोट, कराची येथील हवाई संरक्षण प्रणाली नष्ट करण्यात आल्या.
एस-४०० किती शक्तिशाली आहे?
जगातील सर्वोत्तम हवाई संरक्षण प्रणालींमध्ये गणली जाणारी एस-४०० 'सुदर्शन चक्र' ही एक लांब पल्ल्याची जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली आहे. ही यंत्रणा रशियाच्या अल्माझ-अँटी यांनी विकसित केले आहे. त्यात स्टेल्थ फायटर जेट्स, बॉम्बर्स, क्रूझ, लढाऊ विमान, रडार विमान आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे यासह अनेक हवाई यंत्रणा पाडण्याची क्षमता आहे. त्यात चार वेगवेगळ्या प्रकारची क्षेपणास्त्रे आहेत जी ४०० किलोमीटर अंतरापर्यंतच्या लक्ष्यांवर मारा करू शकतात. यात दोन स्वतंत्र रडार सिस्टीम आहेत, ज्या ६०० किलोमीटर अंतरापर्यंत हवाई लक्ष्य शोधू शकतात आणि एकाच वेळी ८० हवाई लक्ष्यांना लक्ष्य करू शकतात. जर ही प्रणाली तैनात केली तर सिग्नल मिळाल्यानंतर ३ मिनिटांत ती हल्ल्यासाठी तयार होते.