जम्मू-काश्मीरमध्ये पाककडून गोळीबार सुरूच, 4 नागरिकांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2018 14:54 IST2018-05-23T11:37:35+5:302018-05-23T14:54:08+5:30
जम्मू-काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर (LoC) पाकिस्तान वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करत आहे. अरनिया आणि सांबा सेक्टरनंतर पाकिस्तानी रेंजर्सचा आरएसपुरामध्येही गोळीबार सुरू आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये पाककडून गोळीबार सुरूच, 4 नागरिकांचा मृत्यू
श्रीनगर- जम्मू-काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर (LoC) पाकिस्तान वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करत आहे. अरनिया आणि सांबा सेक्टरनंतर पाकिस्तानी रेंजर्सचा आरएसपुरामध्येही गोळीबार सुरू आहे. या गोळीबारात सकाळपासून आतापर्यंत 4 नागरिकांचा मृत्यू झाला. बुधवारी सकाळी कथुआ जिल्ह्यातल्या हिरानगर सीमेवर पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. याच गोळीबारात राम पॉल नावाच्या नागरिकाचा मृत्यू झाला.
पाकिस्ताननं आतापर्यंत बीएसएफच्या जवळपास 40 चौक्यांना लक्ष्य केलं आहे. काल रात्रीपासून पाकिस्तानकडून तोफगोळ्यांचाही मारा करण्यात येतोय. मृत नागरिकांमध्ये तीन जण हिरानगर सेक्टरमधल्या लोदी गावातले असून, एक जण अरनिया सेक्टरमधला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून रात्री उशिरापर्यंत हीरानगर, सांबा, रामगड, अरनिया आणि आरएसपुरा सेक्टरमध्ये गोळीबार सुरू होता.
Ceasefire violation by Pakistan continues in Jammu district's RS Pora. #JammuAndKashmirpic.twitter.com/L36fQPkwSe
— ANI (@ANI) May 23, 2018
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कुरापती पाकिस्तानकडून वारंवार सुरू असलेल्या गोळीबार आणि तोफगोळ्यांच्या माऱ्यामुळे आंतरराष्ट्रीय सीमारेषेपासून पाच किलोमीटर परिसरातील सर्व सरकारी तसंच खासगी शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. तत्पूर्वी मंगळवारी पाकिस्तानकडून मोर्टार डागण्यात आले होते. एलओसीला लागून असलेल्या अरनिया आणि आरएसपुरा सेक्टरलाही पाकिस्ताननं निशाण्यावर घेतलं आहे. या गोळीबारात एका महिलेचा मृत्यू झाला. तर अखनूरमधल्या पल्ली गावात एक निरागस मुलाचा मृत्यू झाला होता.