Pahalgam Terrorist Attack, India vs Pakistan: काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप हिंदूंची हत्या करण्यात आली. या हल्ल्याचा सर्वच स्तरातून निषेध करण्यात येत आहे. पण असे असताना, 'अस्तनीतले निखारे' असा उल्लेख करता येईल असे काही भारतीय नागरिक सध्या पोलिसांच्या रडारवर आहेत. या हल्ल्यासाठी पाकिस्तानला पाठिंबा दिल्याच्या आरोपाखाली आसामच्या धुबरी जिल्ह्यातून आणखी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी शुक्रवारी सांगितले की, अटक केलेल्या व्यक्तीचे नाव अमर अली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर ही अटक करण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट केले की, "पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या देशद्रोह्यांवर कारवाई सुरू आहे. आतापर्यंत एकूण ३७ देशद्रोहींना तुरुंगात पाठवण्यात आले आहे. सर्व देशद्रोह्यांवर कठोर कारवाई केली जाईल." पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पहलगाम हल्ल्यानंतर काही लोक सोशल मीडिया आणि इतर माध्यमातून पाकिस्तानला पाठिंबा देणारी विधाने करत होते. या विधानांना गांभीर्याने घेत, आसाम पोलिसांनी तपास सुरू केला आणि आतापर्यंत राज्याच्या विविध भागातून ३७ लोकांना अटक केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी दिले कडक कारवाईचे आश्वासन
मुख्यमंत्री सरमा म्हणाले की, आसाम सरकार आणि पोलिस असे कोणतेही देशविरोधी वर्तन सहन करणार नाही. देशाच्या एकता आणि अखंडतेशी छेडछाड करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. कोणत्याही व्यक्तीकडून देशविरोधी टिप्पणी किंवा कृती आढळल्यास त्वरित पोलिसांना कळवावे. राज्यात शांतता आणि सुरक्षा राखली जावी आणि कोणत्याही प्रकारच्या दहशतवादी विचारांना प्रोत्साहन दिले जाऊ नये, असा सरकारचा हेतू असल्याचेही त्यांनी ठणकावले.
आमदारही अटकेत
यापूर्वी, आसाम एआययूडीएफ पक्षाचे आमदार अमिनुल इस्लाम यांनाही देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. त्यांच्यावर पाकिस्तानला पाठिंबा दिल्याचा आणि देशविरोधी विधाने केल्याचा आरोप आहे.