बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 12:25 IST2025-04-25T12:24:52+5:302025-04-25T12:25:53+5:30
जम्मू काश्मीर पोलिसांसोबत मिळून सर्च ऑपरेशन सुरू केले. त्यावेळी लष्करी जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. आज सकाळपासून या भागात जोरदार चकमक सुरू आहे. त्यात २ सुरक्षा जवान जखमी झालेत.

बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
श्रीनगर - पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशवासियांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यातील दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर द्या अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्यातच केंद्र सरकारसोबतच भारतीय लष्कर एक्शन मोडमध्ये आले आहे. शुक्रवारी बंदीपोरा इथं सैन्याला मोठं यश मिळाले. लष्करी जवानांनी लश्कर ए तोयबाचा टॉप कमांडर अल्ताफ लल्लीला चकमकीत ठार केला आहे. विशेष म्हणजे पहलगाम हल्ल्याची जबाबदारी लश्कर ए तोयबाच्या रेजिस्टेंस फोर्सनं घेतली होती.
२२ एप्रिलला पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २८ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला. त्यात काही महाराष्ट्रातील पर्यटकही होते. दहशतवाद्यांच्या या कृत्यानंतर काश्मीर खोऱ्यात भारतीय सैन्याकडून सर्च मोहीम वेगाने सुरू आहे. बंदीपोरा भागात काही दहशतवादी असल्याची माहिती सैन्याला मिळाली. त्यानंतर जम्मू काश्मीर पोलिसांसोबत मिळून सर्च ऑपरेशन सुरू केले. त्यावेळी लष्करी जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. आज सकाळपासून या भागात जोरदार चकमक सुरू आहे. त्यात २ सुरक्षा जवान जखमी झालेत.
आसिफ शेखचं घर उद्ध्वस्त
दहशतवादी नेटवर्कविरोधात सैन्याने कठोर पाऊल उचलले आहे. त्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या आणि पहलगाम हल्ल्यात सहभागी दहशतवादी आसिफ शेखचं घर बॉम्बने उडवण्यात आले आहे. आसिफ लश्कर ए तोयबाचा दहशतवादी होता. सुरक्षा जवानांनी त्रालमध्ये ही कारवाई केली.
हँड ग्रेनेड आणि शस्त्रसाठा जप्त
बंदीपोरा भागात नाका तपासणीदरम्यान पोलिसांनी मोहम्मद रफिक खांडे आणि मुख्तार अहमद डार यांना पकडले. त्यांच्याकडून बेकायदेशीर शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला. जेव्हा पोलिसांनी भारतीय सैन्यासह नाकेबंदी केली तेव्हा त्यांनी रईस अहमद डार आणि मोहम्मद शफी डार यांना अटक केली. त्यांच्याकडून हँड ग्रेनेड ०१, ७.६२ मिमी मॅगझिन ०१ आणि ७.६२ मिमीचे ३० राउंड जप्त करण्यात आले.
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ
देशात दहशतवाद्यांचे उरलेसुरले अस्तित्व पूर्णपणे उद्धवस्त करण्याची वेळ आली आहे. प्रत्येक दहशतवादी व त्याच्या पाठीराख्यांना आम्ही शोधून काढू व त्यांच्यावर कठोर कारवाई करू. जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात ते दडून बसले असतील तरी त्यांना हुडकून काढू असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला होता.