पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि लष्कर-ए-तोयबा (एलईटी) दहशतवादी हाशिम मुसा याचा सोमवारी भारतीय सैन्याने श्रीनगरच्या लिडवास भागात खात्मा केला. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात जीव गमावलेले लेफ्टनंट विनय नरवाल यांचे वडील राजेश नरवाल यांनी सैन्याच्या या कारवाईनंतर प्रतिक्रिया दिली आहे. सैन्याला सलाम, कारण या भयानक हल्ल्याचा मास्टरमाईंड श्रीनगरच्या बाहेरील भागात मारल्या गेलेल्या तीन दहशतवाद्यांमध्ये होता असं म्हटलं आहे.
लेफ्टनंट नरवाल यांचे वडील राजेश नरवाल यांनी कर्नालमध्ये माध्यमांशी बोलताना सांगितलं की, "मी सैन्य, आपल्या निमलष्करी दलांना आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या सैनिकांना त्यांच्या शौर्याबद्दल सलाम करू इच्छितो. त्यांनी ज्या प्रकारे त्यांच्या जीवाची पर्वा न करता दहशतवाद्यांचा खात्मा केला ते सोपं काम नाही. मी त्यांच्या शौर्याबद्दल त्यांना सलाम करतो. यासाठी त्यांना सन्मानित केलं पाहिजे."
"सुरुवातीपासूनच मी पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचं बोलत आहेत. ही कारवाई आपल्या सैन्याचं एक मोठं यश आहे. मी आधीच सांगितलं होतं की, आपले जवान एक दिवस त्यांना ठार मारतील." मे महिन्यात झालेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर, राजेश नरवाल यांनी भारताने दिलेल्या चोख प्रत्युत्तराचं कौतुक केलं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने एक कडक संदेश दिला आहे. आता २२ एप्रिलच्या हल्ल्याचे कट रचणारे भविष्यात असे हल्ले करण्यापूर्वी शंभर वेळा विचार करतील असं म्हटलं.
पहलगाम हल्ल्याच्या काही दिवस आधी भारतीय नौदलाचे अधिकारी विनय नरवाल (२६) यांचं लग्न झालं होतं. ते पत्नी हिमांशीसोबत पहलगामला हनिमूनसाठी गेले होते. याच दरम्यान दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या दहशतवादी हल्ल्यात अनेकांना आपला जीव गमावावा लागला. आर्मी पॅरा कमांडोंनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि त्याच्या दोन साथीदारांना काश्मीरमधील श्रीनगरच्या बाहेरील जंगलात झालेल्या चकमकीत ठार केलं. सुरक्षा दलांना तेथे लपलेल्या दहशतवादींबद्दल काही माहिती मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलांनी 'ऑपरेशन महादेव' नावाची मोहीम सुरू केली आणि हाशिम मुसासह तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.