Pahalgam Terror Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेमधील 9 दहशतवादी अड्डे नष्ट केले. पण, अद्याप 26 निष्पाप पर्यटकांवर गोळ्या झाडणारे चार मुख्य हल्लेखोर सापडले नाहीत. त्यांच्या शोधासाठी खोऱ्यात शोध मोहीम राबवली जात आहे. दरम्यान, आता दहशतवाद्यांचा एक नवीन पॅटर्न समोर आला आहे.
सैन्याच्या युनिफॉर्मचा वापर'फर्स्टपोस्ट'च्या वृत्तानुसार, जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दलांची तैनाती आवश्यक झाली आहे. पण आता सुरक्षा दलांसमोर एक नवीन आव्हान उभारले आहे. अलिकडच्या काळात झालेल्या किमान तीन घटनांमध्ये सैन्याचे युनिफॉर्म घालून दहशतवादी सीमेवरुन घुसखोरी करत असल्याचे समोर आले आहे. पहलगाम हल्लादेखील अशाच पद्धतीने घडवून आणला होता. भारतीय सैन्यासारखा गणवेश परिधान केलेल्या 'द रेझिस्टन्स फ्रंट' या दहशतवादी गटाच्या दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला होता.
सुरक्षा दलांसमोर नवे आव्हानगेल्या आठवड्यात त्रालमध्ये झालेल्या चकमकीत आसिफ अहमद शेख, अमीर नजीर वाणी आणि यावर अहमद भट हे तीन दहशतवादी मारले गेले. मिळालेल्या माहितीनुसार, तिन्ही दहशतवाद्यांनी लष्करासारखा गणवेश परिधान केला होता. 10 मे रोजीदेखील नगरोटा मिलिटरी स्टेशनवरील रक्षकांनी एका संशयित घुसखोराला पाहताच गोळीबार सुरू केला, पण तो पळून जाण्यात यशस्वी ठरला. लष्करी गणवेश परिधान केलेल्या अतिरेक्यांनी सुरक्षा दलांमध्ये मोठी चिंता निर्माण केली आहे. अधिकाऱ्यांना भीती आहे की, यामुळे गोंधळ निर्माण होऊ शकतो. सामान्य नागरिक आणि सुरक्षा दलांमधील विश्वास नष्ट करण्याचा हा थेट प्रयत्न आहे.
गणवेश विक्री आणि शिवणकामावर बंदीअधिकाऱ्यांनी सांगितले की, दिल्लीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीतही या मुद्द्यावर चर्चा झाली. या धोक्याला तोंड देण्यासाठी सुरक्षा एजन्सी आता एसओपीचा आढावा घेत आहेत, विशेषतः चेकपॉईंट्स आणि लोकप्रिय पर्यटन स्थळांवर. या आव्हानाला तोंड देण्यासाठी, जम्मू आणि काश्मीरमधील काही भागात लष्कराच्या गणवेशाची शिवणकाम, विक्री आणि साठवणूक करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.