Cash Reward for terrorists information, Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे पडसाद केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात उमटत आहेत. काश्मीर खोऱ्यातील मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांना गोळ्या घालून मारले. या भ्याड हल्ल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली. हा हल्ला करणाऱ्या चार दहशतवाद्यांपैकी दोन जण पाकिस्तानी असल्याचे समजले असून बाकीचे दोघे स्थानिक असल्याचे सांगितले जात आहे. याचदरम्यान, जम्मू काश्मीर पोलिसांनी या दहशतवाद्यांनी माहिती देणाऱ्यांसाठी मोठ्या बक्षिसाची घोषणा केली आहे.
दहशतवाद्यांची माहिती द्या, बक्षीस मिळवा
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीर पोलिसांनी मोठी घोषणा केली आहे. हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी २० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. सुरक्षा दलांना आणि संस्थांना दहशतवाद्यांची ओळख, त्यांचा ठावठिकाणा किंवा इतर कोणतीही विश्वसनीय माहिती देणाऱ्या लोकांना हे बक्षीस दिले जाणार आहे. हल्ल्याचा तपास जलदगतीने करणे आणि गुन्हेगारांपर्यंत पोहोचणे या उद्देशाने काश्मीर पोलिसांनी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
एकूण सात दहशतवाद्यांनी मिळून केला हल्ला
पहलगाममधील बैसरन येथे एकूण चार दहशतवाद्यांनी हल्ला केला, तर आणखी तीन दहशतवादी हे त्यांच्या कारवाईवर लक्ष ठेवून होते, अशी माहिती तपासामधून समोर आली आहे. हल्ला करणाऱ्या चार दहशतवाद्यांपैकी दोघेजण पश्तून भाषेत बोलत असल्याचीही माहिती मिळाली आहे. या दहशतवाद्यांनी सुमारे १५ ते २० मिनिटे एके-४७ च्या माध्यमातून गोळीबार करत पर्यटकांना टिपून टिपून लक्ष्य केल्याचंही समोर आले आहे.
दोघांकडे एके-४७
हल्ल्यानंतर घटनास्थळावरून सुमारे ५०-७० वापरलेली काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. राष्ट्रीय तपास संस्थेने अनेक प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले आहेत. या दहशतवाद्यांनी किश्तवाड येथून सीमा ओलांडून पहलगाममध्ये प्रवेश केला. स्थानिक दहशतवाद्यांच्या मदतीने ते कोकरनाग मार्गे बेसरणला पोहोचला. हे दोन दहशतवादी एम४ कार्बाइन रायफल घेऊन आले होते. तर इतर दोघांकडे एके-४७ होती.