पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा आणखी एक कट उघड; गुप्तचर विभागाची माहिती, अलर्ट जारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 12:10 IST2025-05-05T12:09:41+5:302025-05-05T12:10:33+5:30
गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या अलर्टनंतर जम्मू काश्मीर पोलीस महासंचालकांनी श्रीनगर येथे सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली.

पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा आणखी एक कट उघड; गुप्तचर विभागाची माहिती, अलर्ट जारी
जम्मू - पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात तणावाची परिस्थिती आहे. त्यातच जम्मू काश्मीरात पुन्हा दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट जारी केला आहे. जम्मू काश्मीरच्या विविध जेलमध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट आहे. विशेषत: श्रीनगर सेंट्रल जेल आणि जम्मूच्या कोट भलवाल जेलला टार्गेट करण्यात आले आहे. गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनंतर याठिकाणी अलर्ट जारी करण्यात आला आहे.
या जेलमध्ये हायप्रोफाइल दहशतवादी आणि त्यांना मदत करणारे ओवर ग्राऊंड वर्कर बंद आहेत. त्यामुळे जेलच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. या जेलवर हल्ला करून इथले दहशतवादी सोडवण्याचा कट रचण्यात आला आहे. सीक्रेट अलर्टनंतर CISF ने सेंट्रल जेलची सुरक्षा आणखी वाढवली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा हा मोठा कट असल्याचं समोर येत आहे. पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून हत्या केली. त्यानंतर जम्मू काश्मीर पोलीस आणि सरकार सतर्क आहे.
गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या अलर्टनंतर जम्मू काश्मीर पोलीस महासंचालकांनी श्रीनगर येथे सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यात जेलच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. २०२३ साली सीआरपीएफला जम्मू काश्मीर जेलच्या सुरक्षेची जबाबदारी मिळाली आहे. मागील काही दिवसांपासून NIA पहलगाम हल्ल्याची चौकशी करत आहे. त्यात जम्मू जेलमध्ये बंद ओवर ग्राऊंड वर्करचीही चौकशी करण्यात येत आहे. जेलमध्ये बंद असलेल्या २ जणांची कसून चौकशी होत असून या दोघांना राजौरी जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अटक करण्यात आले होते.
दरम्यान, पुंछ जिल्ह्यातही सुरक्षा जवानांना दहशतवाद्यांचा ठिकाणा सापडला आहे. तिथे IED जप्त करण्यात आले आहे. जम्मू काश्मीरच्या जेलमध्ये अनेक बडे दहशतवादी शिक्षा भोगत आहेत. त्यात या जेलवर हल्ला होण्याची शक्यता आहे त्यामुळे इथली सुरक्षा वाढवण्यात आली आहे. श्रीनगर आणि जम्मू या दोन्ही जेलमध्ये स्लीपर सेलचे सदस्यही बंद आहेत. पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचा अद्याप शोध सुरू आहे. ते दक्षिण काश्मीरात लपल्याची माहिती समोर येत आहे.