नवी दिल्ली - पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २८ पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर देशात संतापाची लाट उसळली आहे. पाकिस्तानचा बंदोबस्त करावा अशी मागणी लोकांकडून जोर धरू लागली आहे. सरकारकडूनही पाकविरोधात आक्रमक पावले उचलली जात आहेत. त्यातच छत्तीसगड काँग्रेसचे माजी आमदार यूडी मिंज यांच्या फेसबुक पोस्टने नवा वाद निर्माण झाला आहे. पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित आहे असा उल्लेख त्यांनी पोस्टमध्ये केला आहे. त्याशिवाय बालाकोट एअरस्ट्राईकवरूनही वादग्रस्त टिप्पणी त्यांनी केली आहे.
सत्ताधारी भाजपाने काँग्रेस नेत्याच्या विधानावर आक्षेप घेतल्यानंतर माझं अकाऊंट हॅक झाल्याचा दावा त्यांनी केला. २६ एप्रिलला शेअर केलेली ही पोस्ट आता काढून टाकण्यात आली आहे. मिंज यांच्या विधानावरून मुख्यमंत्री विष्णु देव सायचे माध्यम सल्लागार पंकज झा यांनी त्यांना फटाकरले आहे. झा यांनी मिंज यांच्या फेसबुक पोस्टचा स्क्रिनशॉट शेअर केला. या पोस्टमध्ये म्हटलंय की, जे आज पाकिस्तानविरोधात निर्णायक युद्धाचं बोलतायेत, त्यांना हेदेखील माहिती असावे पाकिस्तानसोबत भारताला चीनशीही लढावे लागेल आणि अशा स्थितीत भारताचा पराभव निश्चित आहे. पीओके हा महत्त्वाचा भाग असून तिथे चीनने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. हीच अवस्था बलूचिस्तानची आहे असं त्यांनी म्हटलं.
ग्वादर पोर्ट चीनने विकसित केले आहे. त्याच्या सुरक्षेसाठी चीनचे सैन्य तिथे तैनात आहे. बलूचिस्तानच्या बंडखोरांची ताकद चीनी सैनिकांशी लढण्याशी नाही. या दोन्ही ठिकाणी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी सक्रिय आहेत. एटाबाबाद हे असे ठिकाण आहे जिथे लश्कर ए तोयबाचं नेटवर्क आहे. जर भारताने या दोन्ही ठिकाणांवर थेट हल्ला केला तर चीन स्वत: या युद्धात पाकिस्तानसोबत उभा राहील, त्याचा विचार करा असंही काँग्रेस नेते मिंज यांनी सांगितले.
दरम्यान, पुन्हा एकदा काँग्रेस नेता भारताविरोधात बोललो, हे देशद्रोही विधान आहे. जर असे लोक कधी देशहिताचं बोलत असतील तर त्यांच्या विश्वासार्हतेवर आणि चेहऱ्याच्या हावभावावर समजू शकते. विशेषत: युद्धाच्या परिस्थितीत हे चालता फिरता बॉम्बपेक्षा कमी आहे. जेव्हा कधीही चीनकडून धोका निर्माण झाला तेव्हा काँग्रेसने सरेंडर होण्याची घोषणा केली असं भाजपा नेते पंकज झा यांनी म्हटलं. तर माझे फेसबुक हॅक झाले, मी फेसबुकशी संपर्क साधत सुरक्षेसाठी योग्य ते प्रयत्न करत आहे असं काँग्रेस नेते यूडी मिंज यांनी म्हटलं.