Congress Rahul Gandhi: जम्मू-काश्मिरातील पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संसदेच्या दोन्ही सभागृहांचं विशेष अधिवेशन बोलवण्यात यावं, अशी मागणी काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे. या अधिवेशनाच्या माध्यमातून आम्ही सर्वजण दहशतवादाविरोधात एकजूट आहोत, हे दाखवून देऊ, अशा भावनाही राहुल गांधी यांनी व्यक्त केल्या आहेत.
राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की, "पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे प्रत्येक भारतीयाच्या मनात संताप आहे. दहशतवादाविरोधात आम्ही सर्वजण एकत्र उभे आहोत, हे भारताने दाखवलं पाहिजे. संसदेच्या दोन्ही सभागृहांचं विशेष अधिवेशन बोलवण्यात यावं, अशी विरोधी पक्षांची मागणी आहे. या अधिवेशनाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी आपली एकदा आणि दृढनिश्चय दाखवून देतील," असं मत राहुल गांधी यांनी मांडलं आहे.
दुसरीकडे, काँग्रेस अध्यक्ष आणि खासदार मल्लिकार्जुन खरगे यांनीही पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं आहे. "या क्षणाला एकता दाखवण्याची आवश्यकता असून संसदेचं विशेष अधिवेशन बोलावणं गरजेचं असल्याची विरोधी पक्षाची भावना आहे. हे अधिवेशन म्हणजे पहलगाम येथे निष्पाप नागरिकांवर झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याला तोंड देण्यासाठी आपल्या सामूहिक दृढनिश्चयाचे आणि इच्छाशक्तीचे ते एक शक्तिशाली प्रदर्शन असेल. त्यामुळे लवकरात लवकर हे विशेष अधिवेशन बोलवले जाईल, अशी आम्हाला आशा आहे," असं खरगे यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. राहुल गांधी काँग्रेस नेत्यांवर नाराजपहलगाम दहशतवादी हल्ल्यावरील सर्वपक्षीय बैठकीनंतर मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांनी सरकारसोबत असल्याचे म्हटलं आहे. पण, काही काँग्रेस नेते या घटनेबाबत वादग्रस्त विधाने देत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राहुल गांधी काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रियांवर नाराज आहेत. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही आक्षेप व्यक्त केला आहे. तसेच, आता पक्षाच्या नेत्यांना काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत मंजूर झालेल्या ठरावापेक्षा वेगळी विधाने जारी न करण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो.