जम्मू काश्मीरातील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात, पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदद करण्याऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद युसुफ कटारिया असे त्याचे नाव असून, तो दक्षिण कश्मीरातील आहे. त्याने 22 एप्रिलला लश्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांना मदत केली होती. श्रीनगर पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले. यानंतर, त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.मोहम्मद यूसुफ कटारिया हा लश्कर-ए-तैयबाचा (टीआरएफ) दहशतवादी असून त्याच्यावर बैसरन खोऱ्यात 26 जणांच्या हत्येत सामील असलेल्या दहशतवाद्यांना मदत केल्याचा गंभीर आरोप आहे.
असा पकडला गेला कटारिया -पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "ऑपरेशन महादेव दरम्यान जप्त केलेल्या शस्त्रास्त्रे आणि इतर सामग्रीच्या विश्लेषणानंतर कटारियाला अटक करण्यात आली. दहशतवाद्यांच्या हालचालींना मदत आणि सुविधा पुरवण्यात कटारियाची महत्त्वाची भूमिका होती." महत्वाचे म्हणजे, दक्षिण काश्मीरमधील दहशतवादी नेटवर्कविरुद्धच्या कारवाईतील हे मोठे यश असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
कटारियाच्या सहकाऱ्यांची ओळख पटवण्यासंदर्भात आणि लश्कर-ए-तैयबाशी (टीआरएफ) संबंधित दहशतवादी नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे. तसेच, जम्मू-काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि दहशतवादी मॉड्यूल उद्ध्वस्त करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे.
कोण आहे कटारिया? -मोहम्मद युसुफ कटारिया पहलगाम येथे कंत्राटी तत्वावर काम करत होता आणि स्थानिक मुलांना शिकवत होता. काही महिन्यांपूर्वीच तो दहशतवाद्यांच्या संपर्कात आला होता आणि त्यांना मदत करू लागला होता.
ऑपरेशन महादेव -22 एप्रिल रोजी पहलगामच्या बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांनी धर्म विचारून 26 पर्यटकांची हत्या केली होती. पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना टीआरएफने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळं उद्ध्वस्त केली, या कारवाईत सुमारे 100 हून अधिक दहशतवादी ठार झाले होते. त्यानंतर 28 जुलाई रोजी ऑपरेशन महादेव अंतर्गत भारतीय लष्कराने या हल्ल्यात सामील असलेल्या लश्करच्या तीन दहशतवाद्यांना ठार केले.