पहलगाममध्ये पर्यटकांची गोळ्या घालून हत्या करणाऱ्या दशतहवाद्यांपैकी तिघांचा खात्मा करण्यात लष्कराला यश आले. ऑपरेशन महादेवमध्ये पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या आणि इतर दोन दहशतवादी ठार झाले. त्यांच्या ओळखीबद्दल आणि पाकिस्तानी असल्याबद्दल काही माध्यमांनी वृत्त प्रसिद्ध केले. भारतीय लष्कराकडून माहिती दिली गेल्याचे या वृत्तांमध्ये म्हटले गेले. लष्कराने माहिती दिल्याचे वृत्त संरक्षण मंत्रालयाने फेटाळले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ऑपरेशन महादेवमध्ये मारल्या गेलेल्या तीन दहशतवाद्यांजवळ ओळखपत्रे सापडली, त्याचबरोबर बायोमेट्रीक डेटा आणि कराची तयार केलेली चॉकलेट्स सापडली असून ते तिघेही पाकिस्तानी असल्याचे काही माध्यमांनी आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले होते. त्यांच्याजवळ या वस्तू सापडल्याची माहिती भारतीय लष्कराकडून दिली गेली असल्याचेही या रिपोर्ट्समध्ये म्हटले गेले होते. त्यावर संरक्षण मंत्रालयाने खुलासा केला आहे.
संरक्षण मंत्रालयाने काय म्हटलंय?
लष्कराने माहिती दिल्याचे दावा संरक्षण मंत्रालयाने फेटाळून लावला आहे. निवेदनामध्ये म्हटले आहे की, "पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांची ओळख आणि त्यांच्या पार्श्वभूमीबद्दल एक रिपोर्ट माध्यमे आणि सोशल मीडिया हॅण्डल्सवरून प्रसिद्ध केली जात आहे. या रिपोर्टमध्ये भारतीय लष्कराने माहिती दिल्याचा हवाला दिला जात आहे."
"भारतीय लष्कराने कोणत्याही अधिकृत मीडिया हॅण्डलने अशा प्रकारचे कोणतेही निवेदन तयार केलेले नाही किंवा प्रसिद्ध केले नाही. भारतीय लष्कराच्या जनसंपर्क कार्यालयांनी किंवा प्रवक्त्यांकडूनही अशा प्रकारची माहिती दिली गेली नाहीये. हे रिपोर्ट खुल्या स्त्रोतांच्या माध्यमातून माहिती संकलित करून प्रसिद्ध केले गेले आहे, असे दिसत आहे", अशी माहिती संरक्षण मंत्रालयाने प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टबद्दल दिली.
ऑपरेशन महादेवमध्ये लश्कर ए तोयबाचे तीन दहशतवादी मारले गेले होते. २८ जुलै रोजी सुरक्षा जवानांनी तिघांना संपवले. २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये हल्ला केल्यापासून ते तिघेही लपून बसलेले होते. त्यांना मदत करणाऱ्या दोन कश्मिरी व्यक्तींनाही अटक करण्यात आली आहे.