काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 11:37 IST2025-04-29T11:33:40+5:302025-04-29T11:37:54+5:30
दक्षिण काश्मीरमधील पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर सरकार पर्यटकांच्या सुरक्षेबाबत सतर्क झाले आहे.

काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
Pahalgam Attack: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी २६ निष्पाप लोकांची गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर भारताने कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. सुरक्षा दलांनी काश्मीरमध्ये दहशवाद्यांविरोधात मोहिम उघडली आहे. दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्यांची घरे सुरक्षा दलांनी उद्ध्वस्त केली असून अनेकांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. दुसरीकडे, दक्षिण काश्मीरमधील पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर सरकार पर्यटकांच्या सुरक्षेबाबत सतर्क झाले आहे. त्यामुळे काश्मीरमधील काही पर्यटन स्थळे बंद करण्यात आली आहे.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण राज्यात दहशतवादाविरुद्ध सुरक्षा दलांचे ऑपरेशन सुरूच आहे. लष्कर आणि पोलिस कर्मचारी शोध मोहीम राबवत आहेत. या लष्करी कारवाईदरम्यान, जम्मू आणि काश्मीर सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने काश्मीर खोऱ्यातील ४८ पर्यटन स्थळे तात्पुरती बंद केली आहेत. काश्मीरमधील ८७ पैकी ४८ पर्यटन स्थळे तात्पुरती बंद करण्यात आली आहेत.
जम्मू-काश्मीर सरकारने दहशतवादाविरुद्धची शोध मोहीम आणि सुरक्षा आढावा लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्यटकांना ८७ पर्यटन स्थळांना भेट देण्याची परवानगी आहे. तात्पुरती बंद करण्यात आलेली काही पर्यटन स्थळे दहशतवादविरोधी शोध मोहिमेचा भाग आहेत किंवा संवेदनशील ठिकाणी आहेत. पर्यटकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. ही पर्यटन स्थळे तात्पुरती बंद आहेत आणि सुरक्षेच्या परिस्थितीनुसार त्यांचा आढावा घेतला जाईल.
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, पहलगाम हल्ल्यानंतर खोऱ्यात काही स्लीपर सेल सक्रिय झाल्याची माहिती सुरक्षा यंत्रणेला मिळाली आहे. या स्लीपर सेल्सना कारवाई सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर खोऱ्यात सक्रिय दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त केल्याचा बदला घेण्यासाठी दहशतवादी मोठ्या आणि अधिक प्रभावी हल्ल्याची योजना आखत आहेत, असे गुप्तचर अहवालांवरून दिसून आलं आहे. त्यामुळे सुरक्षा दलांनी गुलमर्ग, सोनमर्ग आणि दाल लेक परिसरांसह संवेदनशील पर्यटन स्थळांवर सुरक्षा तैनात केली आहे. यामध्ये जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या विशेष ऑपरेशन्स ग्रुपमधील अँटी फिदायीन पथके तैनात केली आहेत.
दरम्यान, काश्मीर खोऱ्याला भेट देण्याची योजना आखणाऱ्या पर्यटकांनी सूचनांबद्दल माहिती घ्यावी आणि सावधगिरी बाळगावी असा सल्ला देण्यात आला आहे. पर्यटकांनी सुरक्षा कारवाया असलेल्या भागात जाणे टाळावे आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन करावे. रिअल-टाइम अपडेट्ससाठी, प्रवासी अधिकृत सरकारी चॅनेल आणि स्थानिक वृत्तसंस्थांचा संदर्भ घेऊ शकतात, असेही सुरक्षा दलांकडून कडून सांगण्यात आले आहे.