मंड्या : कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यातील श्रीरंगपट्टण येथील साई आश्रमाजवळील कावेरी नदीत प्रसिद्ध कृषी शास्त्रज्ञ आणि पद्मश्री पुरस्कार विजेते डॉ. सुब्बन्ना अय्यप्पन यांचा मृतदेह आढळला.
म्हैसूरच्या विश्वास नगर औद्योगिक क्षेत्रातील अक्कमहादेवी रोडवरील एका अपार्टमेंटमध्ये पत्नीसह राहणारे डॉ. सुब्बन्ना अय्यप्पन ७ मे रोजी घरातून बेपत्ता झाले होते. डॉ. सुब्बन्ना यांना पत्नी आणि दोन मुली आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनी म्हैसूरच्या विद्यारण्यपुरम पोलिस ठाण्यात त्यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवली होती. शनिवारी संध्याकाळी कावेरी नदीत एक अज्ञात मृतदेह दिसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिस पथकाने नदीतून मृतदेह बाहेर काढला. हा मृतदेह पद्मश्री विजेते डॉ. सुब्बन्ना अय्यप्पन यांचा असल्याचे स्पष्ट झाले.
'नील क्रांती'मध्ये महत्त्वाची भूमिका : डॉ. सुब्बन्ना अय्यप्पन यांचा जन्म १० डिसेंबर १९५५ रोजी चामराजनगर जिल्ह्यातील यलंदूर येथे झाला. ते कृषी आणि मत्स्यव्यवसाय (जलसंवर्धन) शास्त्रज्ञ होते. त्यांनी दिल्ली, मुंबई, भोपाळ, बराकपूर, भुवनेश्वर आणि बेंगळुरू येथे काम केले. अय्यप्पन यांनी भारताच्या 'नील क्रांती'मध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. २०२२ मध्ये त्यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले.