कटक: चहा विकून त्यातून येणाऱ्या पैशांमधून गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या देवारापल्ली प्रकाश राव यांचा पद्मश्रीनं सन्मान करण्यात आला. राव ओदिशातल्या कटक शहरातील बुक्सी बाजार भागात चहाचा स्टॉल चालवतात. आपल्या समाजकार्याचा गौरव केंद्र सरकारकडून केला जाणार असल्याची माहिती राव यांनी शुक्रवारी समजली. त्यावेळी ते रुग्णालयात होते. पद्मश्री मिळणार असल्याची बातमी राव यांच्यासाठी आश्चर्याचा धक्का ठरली. शुक्रवारी रात्री साडे अकराच्या सुमारास सरकारकडून राव यांना पद्मश्री पुरस्काराची बातमी समजली. समाजकार्यासाठी त्यांना हा पुरस्कार घोषित झाला. 'देशातला चौथ्या क्रमांकाचा नागरी सन्मान मला मिळणार असल्याची माहिती मला शुक्रवारी रात्री समजली. खरंतर इतक्या मोठ्या पुरस्कारासाठी मी पात्र नाही. पण हा पुरस्कार मी स्वीकारल्यास त्यातून अनेकांना प्रेरणा मिळेल, अशी भावना माझ्या जवळच्या व्यक्तींनी बोलून दाखवली,' असं राव म्हणाले. घरातील आर्थिक परिस्थितीमुळे राव यांना दहावी पूर्ण करता आली नाही. त्यांना शिक्षण अर्धवट सोडून वडिलांचा चहाचा स्टॉल चालवण्याची जबाबदारी खांद्यावर घ्यावी लागली. तेव्हापासून चहाचा स्टॉल हेच त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन झालं. यामधून फार पैसे मिळत नव्हते. मात्र गरिबीमुळे शिक्षण सोडण्याची वेळ कुणावरही येऊ नये, यासाठी त्यांनी अनेकांच्या शिक्षणाचा भार उचलला. समाजातील अनेक गरीब विद्यार्थ्यांना त्यांनी आर्थिक मदत केली. आपल्या कमाईतला 50 टक्के हिस्सा ते वेगळा काढतात. त्यातून 'आशा ओ आश्वासना' ही शाळा चालवतात. गरीब कुटुंबातील होतकरु मुलांना जेवण आणि शिक्षण मिळावं, यासाठी राव यांची धडपड सुरू असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2018 मध्ये कटकला गेले होते. त्यावेळी त्यांनी राव यांची भेट घेतली. मोदींनी मन की बातमध्येही राव यांच्या समाजकार्याचा उल्लेख केला होता. राव यांच्या कामाचं मोदींनी खूप कौतुक केलं होतं. मोदींनी केलेलं कौतुक आयुष्यातली मोठी कमाई असल्याचं राव सांगतात. गरीब मुलांच्या शिक्षणासाठी झटणाऱ्या राव यांनी 1976 पासून आतापर्यंत 200 हून अधिक वेळा रक्तदान केलं आहे.
सलाम! चहा विकून गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणात योगदान; अतुल्य समाजसेवेचा पद्मश्रीनं सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2019 06:18 IST