दिल्लीसह १५ राज्यांत आंदोलनाचा उद्रेक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 06:33 AM2019-12-20T06:33:36+5:302019-12-20T06:33:48+5:30

गोळीबार, हिंसाचारात तिघांचा मृत्यू : नव्या नागरिकत्व कायद्याविरोधात विद्यार्थी व राजकीय कार्यकर्तेही रस्त्यांवर

Outbreak of agitation in 15 states including Delhi on CAA | दिल्लीसह १५ राज्यांत आंदोलनाचा उद्रेक

दिल्लीसह १५ राज्यांत आंदोलनाचा उद्रेक

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात गेल्या रविवारपासून सुरू असलेल्या आंदोलनाने गुरुवारी विराट रूप धारण केल्याने दिल्लीतील जनजीवन पूर्णपणे थांबले. हे आंदोलन पसरू नये, म्हणून सरकारने दिल्लीतील मोबाइल व इंटरनेट सेवा बंद केल्या. तसेच २0 मेट्रो स्टेशन्स बंद केली. त्यामुळे लोकांना अडचणींचा सामना करावा लागला.
महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान पश्चिम बंगाल, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, बिहार, आसाम, मेघालय, पंजाब, गोवा आदी १५ राज्यांतही नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात विद्यार्थी
व राजकीय पक्षांचे कार्यकर्तेही उतरले होते.
दिल्लीमध्ये माकप नेते सीताराम येचुरी, वृंदा करात, सीपीआयचे डी. राजा, काँग्रेस नेते अजय माकन, संदीप दीक्षित, स्वराज इंडियाचे योगेंद्र यादव यांच्यासह पोलिसांनी जवळपास ६०० लोकांना ताब्यात घेतले, तर कर्नाटकात प्रख्यात इतिहास संशोधक रामचंद्र गुहा यांनाही पोलिसांनी अटक केली. कर्नाटकच्या अनेक शहरांतील विद्यार्थी आंदोलनात उतरले होते.
उत्तर प्रदेशात काही ठिकाणी आंदोलकांनी जाळपोळ केली. तिथे एसटी बसेससह काही खासगी वाहने पेटवण्यात आली.
त्यांच्यावर पोलिसांनी लाठीमार केला. बिहारमध्ये अनेक
रेल्वेगाड्या अडवण्यात आल्या. तसेच गुजरात, बिहार, कर्नाटक आदी राज्यांमध्ये आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी
बळाचा वापर केला. जवळपास या सर्व राज्यांमध्ये पोलिसांनी आंदोलनाची शक्यता लक्षात घेऊ न जमावबंदी लागू केली होती. पण ती झुगारून हजारो लोक या कायद्याच्या विरोधात रस्त्यांवर उतरले होते.
हे आंदोलन पसरू नये, म्हणून सरकारने दिल्लीत इंटरनेट सेवा बंद करतानाच, अनेक रस्तेही बंद केले. त्यामुळे लोकांना कुठेही जाणे अशक्य झाले. अनेक वैमानिक पोहोचू न शकल्याने काही विमाने रद्द करावी लागली. तसेच मेट्रो रेल्वे स्टेशन व शहरातील बससेवा बंद केल्याने लोकांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागला.


२० गाड्यांतून आंदोलकांना नेले
दिल्लीच्या मंडी हाउसपासून शहीद पार्कमध्ये माकपचे नेते सीताराम येचुरी यांच्या नेतृत्वाखाली मोर्र्चा निघाला. या परिसरातही पोलिसांनी जमावबंदी लागू करून, येचुरी, डी. राजा, वृंदा करात, निलोत्पल बसू यांनाही ताब्यात घेतले.
जमावबंदीचा आदेश झुगारून अनेक विद्यार्थी जंतरमंतरवर जमा झाले होते.विद्यार्थ्यांनी तोंडाला पट्ट्या लावून ‘सेव्ह कान्स्टिट्युशन’ असा मजकूर लिहिलेले फलक
हाती घेतले होते.
हजारो विद्यार्थी सकाळपासून लाल किल्ला परिसरात जमा झाले होते. परंतु पोलिसांनी तिथे लगेचच जमावबंदी लागू केली आणि विद्यार्थी नेता उमर खालिद याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी सर्वच विद्यार्थ्यांना पकडण्याचे सत्र सुरू केले. तेथून सुमारे २० गाड्या भरून विद्यार्थ्यांना नेण्यात आले. सर्वांना संध्याकाळी सोडण्यात आले.

पोलिसांच्या कारवाईचा निषेध
च्गेल्या रविवारी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे आंदोलन पोलिसांनी बळाचा वापर करून दाबून टाकण्याचा प्रयत्न केला. त्याची प्रतिक्रिया आज पाहायला मिळाली.
च्सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिल्यानंतर हिंसा थांबल्यानंतर दिल्लीतील जनजीवन सुरळीत होईल, असे वाटत असताना लाल किल्ला परिसरातून निघालेल्या शांतता मार्चवर पोलिसांनी निर्बंध घातले. जामिया, जेएनयू व दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनांनी लाल किला परिसरात शांततेने आंदोलनाचे आवाहन केले होते.
तीन जणांचा मृत्यू : मंगळुरूमध्ये दगडफेक करणाऱ्या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला. दगडफेकीत २0 पोलीस जखमी झाले. लखनऊमध्ये आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यात एक जण मरण पावला.

Web Title: Outbreak of agitation in 15 states including Delhi on CAA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.