आमचा युतीला उघड पाठिंबा, आंबेडकर करतात छुपी मदत - रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2019 05:18 AM2019-03-24T05:18:19+5:302019-03-24T05:18:37+5:30

आम्ही राज्यात भाजपा-शिवसेना युतीमध्ये असूनही आम्हाला सत्तेत पुरेसा वाटा मिळालेला नाही, हे खरे आहे. आम्हाला सत्तेत वाटा मिळायलाच हवा.

 Our support is open to support, Ambedkar's hidden help - Ramdas Athawale | आमचा युतीला उघड पाठिंबा, आंबेडकर करतात छुपी मदत - रामदास आठवले

आमचा युतीला उघड पाठिंबा, आंबेडकर करतात छुपी मदत - रामदास आठवले

Next

- संजीव साबडे।

मुंबई : आम्ही राज्यात भाजपा-शिवसेना युतीमध्ये असूनही आम्हाला सत्तेत पुरेसा वाटा मिळालेला नाही, हे खरे आहे. आम्हाला सत्तेत वाटा मिळायलाच हवा. पण त्यासाठी आम्ही युतीतून बाहेर पडणार नाही, असे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे प्रमुख व केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ‘लोकमत’ च्या मुलाखतीत केले.

तुमचा पक्ष राष्ट्रीय असल्याचे तुम्ही सांगता, पण देशात लोकसभेची एकही जागा का लढवत नाही?
हे खरे आहे. आमच्यामुळे उत्तर प्रदेशात १३ टक्के दलितांची मते मिळाली होती आणि आताही मिळतील. अनेक राज्यांत आमच्यामुळे रालोआ व भाजपाचा फायदा झाला आहे. पण आमचा यंदा एकही उमेदवार नाही, हेही खरे आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवशक्ती व भीमशक्ती यांना एकत्र आणले. त्याचा फायदा राज्यात युतीला झालाच. शिवसेनेने आम्हाला दक्षिण मुंबईची जागा द्यायला हवी होती. उद्धव ठाकरे यांनी त्याग करायला हवा होता. तेथून मी निवडून आलो असतो. आता किरीट सोमय्या यांच्या ईशान्य मुंबईची जागा आम्हाला द्यावी, असा प्रयत्न सुरू आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींशी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपले त्याबाबत बोलणे झाले आहे. काय होते ते पाहू. ईशान्य मुंबईतून मी स्वत: लढलोहोतो. त्यावेळी सव्वादोन लाख मते मिळवली होती.

भाजपाने ती जागा सोडली नाही तर?
ती जागा मिळेलच, असे नाही. पण त्यामुळे आम्ही युतीतून बाहेर पडणार नाही. भाजपाच्या कमळ या निवडणूक चिन्हावर आमचा उमेदवार लढणार नाही, असे आम्ही स्पष्ट केले होते. लोकसभेनंतर विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यावेळी अधिक जागा आम्ही मागू. विधान परिषदेवरही आमच्या कार्यकर्त्यांना स्थान हवे, असे आमचे म्हणणे आहे. राज्यसभेवरही आम्हाला स्थान हवे. देशात पुन्हा रालोआचे, मोदींचेच सरकार येणार आहे. त्यावेळी स्वतंत्र खात्याचा कारभार असलेले राज्यमंत्रीपद मला मिळावे, असे आमचे म्हणणे आहे.

तुम्हाला कायम पद मिळते. पण कार्यकर्त्यांचे काय? त्यांच्यावर अन्यायच होतो.
सत्तेत आम्हाला पुरेसा वाटा मिळालेला नाही, हे खरेच. पण महात्मा फुले महामंडळाचे अध्यक्षपद आम्हाला मिळाले आहे. तसेच राज्यात व मुंबईत अनेक कार्यकर्त्यांच्या एसईओपदी नेमणुका झाल्या आहेत. अनेक महामंडळांवर आमच्या कार्यकर्त्यांच्या नेमणुका झाल्या आहेत. त्या तीन वर्र्षासाठी आहेत. शिवाय मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे काम मार्गी लावले आहे. अ‍ॅट्रॉसिटी कायदा आमच्या मागणीप्रमाणे पुन्हा कडक केला. समाजकल्याण खात्याच्या अर्थसंकल्पात भरीव वाढ करण्यात आली. अनेकांना घरे मिळाली, शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा झाले. अनेक घरात गॅस कनेक्शन्स आली. त्याचा सर्वाधिक फायदा दलित व वंचित यांनाच झाला आहे. मोदी यांनी इतकी कामे केल्यामुळे आम्ही सत्तेतून बाहेर पडण्याचा वा वेगळा विचार करण्याची गरजच नाही.

तुम्ही व प्रकाश आंबेडकर राज्यात युतीलाच मदत करत आहात की काय?
आम्ही युतीमध्ये आहोत. त्यामुळे आमचा शिवसेना-भाजपा यांना उघड पाठिंबा आहे. पण प्रकाश आंबेडकरही छुप्या पद्धतीने युतीलाच मदत करणारी भूमिका घेत आहेत. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत.

Web Title:  Our support is open to support, Ambedkar's hidden help - Ramdas Athawale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.