"आमची कन्हैया तोफ ‘एनडीए’च्या नेत्यांना लोळवणार, बिहारमध्ये आता महाआघाडीचे सरकार येणार"
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2020 07:09 IST2020-10-20T03:32:22+5:302020-10-20T07:09:11+5:30
भाजपचा आलेख हा सतत घसरत आहे. यावेळी बिहारही त्यांच्या हातून जाईल आणि महाआघाडीचे सरकार येईल असा दावा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव आणि मंडळ सदस्य भालचंद्र कानगो यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.

"आमची कन्हैया तोफ ‘एनडीए’च्या नेत्यांना लोळवणार, बिहारमध्ये आता महाआघाडीचे सरकार येणार"
विकास झाडे
नवी दिल्ली : नितीशकुमार यांनी बिहारमध्ये पंधरा वर्षांत कोणती विकासकामे केलीत? असा प्रश्न त्यांना मतदार विचारत आहेत. मान खाली घालण्याशिवाय त्यांच्याकडे कोणतेही उत्तर नाही. दुसरीकडे २०१९ पासून भाजप कुठेही स्वबळावर सरकार स्थापन करू शकले नाही. भाजपचा आलेख हा सतत घसरत आहे. यावेळी बिहारही त्यांच्या हातून जाईल आणि महाआघाडीचे सरकार येईल असा दावा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव आणि मंडळ सदस्य भालचंद्र कानगो यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.
कानगो म्हणाले, निव्वळ पैसा ओतून निवडणूक जिंकता येते हे समीकरण महाविकास आघाडी यंदा बिहारच्या निवडणुकीत बदलणार असल्याचे स्पष्ट चित्र आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष, सीपीएम आणि सीपीएमएल मिळून महाआघाडीसोबत २९ जागांवर मैदानात आहे. बिहारमधील कन्हैयाकुमार, अतुलकुमार अंजान, अमरजित कौर यांच्यासारखे नेते बिहारमधील सभा गाजवीत आहेत.
आमचा एकटा कन्हैयाकुमार भाजपला भारी पडणारा आहे. भाजप नितीशकुमारांचे उमेदवार कसे पडतील याचे डावपेच आखत आहे. लोजपाला याकामासाठीच भाजपने स्वतंत्र केले आहे. यात नितीशकुमार यांना फटका तर बसणारच आहे; परंतु भाजपचेही उमेदवार पराभूत होतील.
भाजपची ‘जादू’ नाही : कानगो म्हणाले, दिल्ली, मध्यप्रदेश, हरियाणा, गोवा, मणिपूर, राजस्थान आदी राज्यांत भाजपला किती जागा मिळाल्या हे बघितले तर भाजपची जादू आता उरली नाही. बिहार भाजपच्या ताब्यात यावा म्हणून नितीशकुमारांविरोधात छुपा अजेंडा राबविला जात आहे. नितीशकुमारही यात मागे नाहीत. त्यांच्याकडूनही भाजपचे उमेदवार पाडण्याचे प्रयत्न होतील.
बिहारमध्ये श्रमिकांच्या हाताला काम नाही. आरोग्यसेवा संपूर्ण ढासळली आहे. लोक उपचाराविना मरताहेत. स्थलांतरित मजुरांना बिहार सरकार रोजगार देऊ शकले नाही.