जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा अचानक राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपराष्ट्रपती पदी निवडणूक जाहीर झाली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल व मुळचे तामिळनाडूचे सीपी राधाकृष्णन हे एनडीएकडून उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार असणार आहेत. तर विरोधकही तामिळनाडूमधूनच उमेदवार देण्याची तयारी करत आहेत. डीएमकेने विचारधारेमुळे राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्यास नकार दिला आहे. यावरून भाजपा टीका करत असतानाच डीएमकेचाच उमेदवार देण्याची तयारी विरोधक करत आहेत.
विरोधी पक्ष इंडिया गट द्रमुकचे राज्यसभा खासदार तिरुची शिवा यांना उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्याची शक्यता आहे. यामुळे डीएमकेसमोरील तामिळ बाण्यावरील मोठे संकट दूर होणार आहे. प्रादेशिक राजकारणामुळे निर्माण झालेल्या प्रमुख अडथळ्यावर मात करण्यासाठी ही खेळी खेळली जाण्याची शक्यता आहे. शिवा यांच्या उमेदवारीवर आज सायंकाळच्या इंडिया आघाडीच्या बैठकीत शिक्कामोर्तब होणार असल्याचे सांगितले जात आहे. डीएमकेने शिवा यांच्यासह इस्त्रोचे माजी वैज्ञानिक अण्णादुराई यांचेही नाव सुचविले आहे.
९ सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक होत आहे. सी.पी. राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. त्यांना एनडीएने उमेदवार केले आहे. पक्षीय बलाबलानुसार राधाकृष्णन यांचेच पारडे जड आहे. यामुळे महाराष्ट्राचे देखील राज्यपाल बदलण्याची शक्यता आहे. इंडिया आघाडीपेक्षा एनडीएचीच ताकद जास्त आहे. एनडीएकडे ४२७ लोकसभा, राज्यसभा खासदारांचा पाठिंबा आहे. तर विरोधकांकडे 354 खासदार आहेत. यामुळे राधाकृष्णन यांचा विजय पक्का मानला जात आहे. तरीही विरोधक राधाकृष्णन यांना टक्कर देण्याची तयारी करत आहेत.