नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बनावट मतदार यादीच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी निवडणूक आयोगाने आज विरोधी पक्षाच्या ३० सदस्यांच्या शिष्टमंडळाला बैठकीसाठी बोलावले आहे. मात्र, या बैठकीपूर्वी इंडिया आघाडीतील खासदारांनी निवडणूक आयोगाच्या दिशेने मोर्चा काढला. यादरम्यान, अनेक खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
दिल्लीत विरोधकांची एकजुटमतचोरीच्या मुद्द्यावरुन सध्या देशातील राजकारण तापले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतदार यादीतील अनियमिततेबाबत गंभीर आरोप केले आहेत. यावरुन आज राहुल यांच्या नेतृत्वात विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेच्या मकर द्वार ते निवडणूक आयोग कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. मात्र, दिल्ली पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकरल्यामुळे सर्व आंदोलक खासदारांना रोखण्यात आले.
बॅरिकेड तोडण्याचा प्रयत्न...मोर्चा रोखण्यासाठी जागोजागी बॅरिकेडिंग लावली गेली आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर दिल्ली पोलिसांसह निमलष्करी दलाचे जवानही तैनात करण्यात आले. मात्र, अनेक खासदारांनी बॅरिकेडवर चढण्याचा प्रयत्न केला. सपा प्रमुख अखिलेश यादव तर बॅरिकेडवरुन उडी मारून दुसऱ्या बाजुला पोहोचले. याशिवाय तृणमूल काँग्रेसच्या खासदार सागरिका घोष आणि महुआ मोइत्रादेखील बॅरिकेडवर चढल्या. पोलिसांनी खासदारांना रोखल्यानंतर सर्व खासदार जागेवरच धरणे आंदोलनावर बसले.
अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यातभारतीय निवडणूक आयोगाच्या सचिवालयाने काँग्रेस खासदार जयराम रमेश यांना पत्र लिहून दुपारी १२:०० वाजता चर्चेसाठी वेळ दिला होता. जागेअभावी जास्तीत जास्त ३० जणांची नावे कळवावीत अशी विनंती आयोगाने केली होती. मात्र, सर्व विरोधी पक्षाचे खासदार निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाण्यावर ठाम होते. पोलिसांनी खासदारांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र कुणीही ऐकायला तयार नव्हते. अखेर दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी, प्रियंका गांधी, संजय राऊत आणि सागरिका घोष यांच्यासह इतर अनेक खासदारांना ताब्यात घेतले.
मतदार यादीवरुन वादमतदार यादीतील अनियमिततेवरुन विरोधकांनी हा लढा सुरू केला आहे. राहुल गांधींसह सर्व विरोधी नेते निवडणूक आयोगावर गंभीर प्रश्न उपस्थित करत आहेत. राहुल यांनी निवडणूक आयोगावर थेट मत चोरीचा आरोप केला आहे. यासंदर्भात त्यांनी काल एक मोहीमही सुरू केली आहे. याअंतर्गत राहुल यांनी एक वेबसाइटही सुरू केली आहे. यासोबतच त्यांनी लोकांना या मोहिमेत सामील होण्याचे आवाहनही केले आहे.