निवडणूक आयोगाविरुद्ध विरोधी पक्षांनी आज संसदेपासून ते आयोगापर्यंत निषेध मोर्चा काढला आहे. पोलिसांनी रोखल्याने या नेत्यांची पोलिसांसोबत झटापटही झाली आहे. यामध्ये तृणमूलच्या दोन महिला खासदार चक्कर येऊन पडल्या होत्या. या खासदारांना राहुल गांधी यांनी पाणी पाजत गर्दीपासून दूर नेले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चात ३०० हून अधिक विरोधी पक्षाचे खासदार सहभागी झाले होते.
या आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी बॅरिकेडींग केलेले आहे. यावेळी पोलिसांसोबत झालेल्या झटापटीत तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा बेशुद्ध पडल्या. त्यांना राहुल गांधी यांनी पाणी पाजत शुद्धीवर आणले. यानंतर काही वेळाने टीएमसीच्या आणखी एक महिला खासदार मिताली बाग या बेशुद्ध पडल्या. त्यांना शुद्धीवर आणण्यासाठी सहकारी खासदारांनी रस्त्यावरच झोपवून त्यांच्यावर पाणी मारले, यानंतर राहुल गांधी आले आणि त्यांना पकडून दुसरीकडे घेऊन गेले.
यानंतर काही वेळाने राहुल गांधी, प्रियंका गांधींसह इतर नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. संजय राऊत, सागरिका घोष यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
बिहारमधील मतदार यादी पुनर्रचनेच्या विरोधात निषेध करण्यासाठी मल्लिकार्जुन खरगे आणि शरद पवार यांच्यासह विरोधी पक्षाच्या खासदारांनी सोमवारी संसद भवनापासून निवडणूक आयोगाच्या मुख्यालयापर्यंत मोर्चा काढला. परंतू पोलिसांनी या आंदोलक खासदारांना वाहतूक भवनाजवळच रोखले. यामुळे सर्व नेते रस्त्यावरच बसून 'मत चोरी'च्या घोषणा देऊ लागले.
अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यातभारतीय निवडणूक आयोगाच्या सचिवालयाने काँग्रेस खासदार जयराम रमेश यांना पत्र लिहून दुपारी १२:०० वाजता चर्चेसाठी वेळ दिला होता. जागेअभावी जास्तीत जास्त ३० जणांची नावे कळवावीत अशी विनंती आयोगाने केली होती. मात्र, सर्व विरोधी पक्षाचे खासदार निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाण्यावर ठाम होते. पोलिसांनी खासदारांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र कुणीही ऐकायला तयार नव्हते. अखेर दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी, प्रियंका गांधी, संजय राऊत आणि सागरिका घोष यांच्यासह इतर अनेक खासदारांना ताब्यात घेतले.