गोवेकरांचा विरोध, तरी मंत्री ब्राझीलला
By Admin | Updated: July 2, 2014 04:59 IST2014-07-02T04:59:22+5:302014-07-02T04:59:22+5:30
मजूरमंत्री आवेर्तिन फुर्तादो, वीजमंत्री मिलिंद नाईक, आमदार मायकल लोबो, बेंजामिन सिल्वा, कार्लुस सिल्वा, ग्लेन टिकलोब्राझीलच्या दौऱ्यावर रवाना

गोवेकरांचा विरोध, तरी मंत्री ब्राझीलला
पणजी : गोवा क्रीडा प्राधिकरणाने (साग) आरक्षित केलेल्या तिकिटांवरच मजूरमंत्री आवेर्तिन फुर्तादो, वीजमंत्री मिलिंद नाईक, आमदार मायकल लोबो, बेंजामिन सिल्वा, कार्लुस सिल्वा, ग्लेन टिकलो हे सहा प्रतिनिधी बुधवारी ब्राझीलच्या दौऱ्यावर रवाना होत आहेत. मंत्री-आमदारांचा हा दौरा कोणत्या कंपनीने स्पॉन्सर केला आहे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गोवा भेटीवेळी भाजपाच्या मंत्री-आमदारांच्या ब्राझील दौऱ्याचा विषय ऐरणीवर आला होता. त्यावर देशभरातून टीका झाली होती. त्यानंतर स्वखर्चाने परदेशी जाणार असल्याचे संबंधितांनी जाहीर केले होते.
गोवा क्रीडा प्राधिकरणाने मुंबईतील एका ट्रॅव्हल एजन्सीमार्फत विमान तिकिटे काढली होती. मात्र ही तिकिटे रद्द करण्याचे सौजन्य क्रीडा प्राधिकरणाने दाखवले नाही. आम्ही ब्राझील दौऱ्यावरून परतल्यानंतर तिकिटांचा खर्च देऊ, असे एका आमदाराने सांगितले. मात्र दौऱ्यावर जाण्यापूर्वी विमान तिकिटांचा खर्च शासकीय तिजोरीत मंत्री, आमदारांनी का जमा केला नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आपण तिकीट वापरले तरी, तिकिटाचे व व्हिसाचे पैसे क्रीडा खात्याला दिले आहेत, असा एक- दोन आमदारांचा दावा आहे. ब्राझीलमध्ये फुटबॉलचे सामने पाहण्यासाठी हे मंत्री- आमदार जात आहेत. या प्रकाराबाबत जनतेत प्रचंड नाराजी आहे. (खास प्रतिनिधी)