मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 05:56 IST2025-07-23T05:56:28+5:302025-07-23T05:56:41+5:30
नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहांत पुन्हा बिहार मतदारयादी पुनरावलोकनासह इतर मुद्यावरून प्रचंड गोंधळ ...

मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहांत पुन्हा बिहार मतदारयादी पुनरावलोकनासह इतर मुद्यावरून प्रचंड गोंधळ झाला. यामुळे दुपारी लोकसभा व राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
कामकाज सुरू झाल्यावर सकाळी ११ वाजताच दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब करावे लागले. त्यामुळे प्रश्नोत्तरे होऊ शकली नाहीत. यादरम्यान, विरोधी पक्षाच्या सदस्यांनी लोकसभेत बॅनर आणि पोस्टर फडकावले आणि संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधकांवर दुहेरी भूमिका घेत असल्याचा आरोप केला. यामुळे अधिकच गोंधळ उडाला.
पंतप्रधानांनी उत्तर द्यावे!
ऑपरेशन सिंदूर, भारत-पाक संघर्षात युद्धबंदीचे श्रेय घेऊन ट्रम्प करीत असलेले दावे, तसेच बिहार मतदारयादी पुनरावलोकनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहात उपस्थित राहून उत्तर द्यावे, अशी मागणी करण्यात आली.
सरकार, विरोधक नेमके काय म्हणतात?
रिजिजू यांनी सरकार सर्व मुद्यावर चर्चेस तयार असल्याचे सांगून सर्वांना संधी मिळेल, अशी हमी दिली. दोन्ही सभागृहांत पीठासीन अधिकाऱ्यांनी कामकाज सुरळीत चालावे म्हणून सहकार्य करण्याचे आवाहन केले. मात्र, दुपारपर्यंत गोंधळ सुरूच राहिला. अखेर कामकाज दिवसभरासाठी तहकूब झाले. ‘इंडिया’ आघाडीच्या सदस्यांनी संसदेच्या ‘मकर द्वार’वर निदर्शने केली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी व इतर नेते यावेळी उपस्थित होते.