भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला पाकिस्तानमध्ये हवाई हल्ले करून घेतला. भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ही कारवाई केली. पत्रकार परिषदेत डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी या ऑपरेशन सिंदूरबद्दल महत्त्वाची माहिती दिली.
"पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात ९ दहशतवादी अड्ड्यांवर झालेल्या हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले, ज्यात युसूफ अझहर, अब्दुल मलिक रऊफ आणि मुदासिर अहमद सारखे मोठे दहशतवादी होते. हे दहशतवादी IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातही सहभागी होते. लष्कर-ए-तोयबाचे केंद्र असलेल्या आणि अजमल कसाब, डेव्हिड हेडलीसारखे दहशतवादी निर्माण करणाऱ्या मुरीदकेचंही मोठं नुकसान झालं आहे."
युसूफ अझहर हा IC-814 प्लेन हायजॅकचा मास्टरमाइंड
"युसूफ अझहर हा IC-814 प्लेन हाईजॅकचा मास्टरमाइंड होता, जो जैश-ए-मोहम्मदशी संबंधित होता. तसेच अब्दुल मलिक रऊफ IC-814 हायजॅकिंगसह पुलवामा हल्ल्याच्या कटात सहभागी होता. हवाई हल्ल्याचा उद्देश दहशतवादी हल्ल्यांच्या कट रचणाऱ्यांना शिक्षा करणं आणि त्यांच्या दहशतवादी पायाभूत सुविधा नष्ट करणं हा होता, जो आम्ही यशस्वीरित्या साध्य केला" असं राजीव घई यांनी म्हटलं आहे.
"दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
मोहम्मद युसूफ अझहरला उस्तादजी आणि घोसी साहब म्हणूनही ओळखलं जात होतं. अझहर हा जैश-ए-मोहम्मदचा मुख्य कमांडर होता आणि तो मौलाना मसूद अझहरचा मेहुणा होता. तो जैश-ए-मोहम्मदसाठी शस्त्रास्त्र प्रशिक्षणाची जबाबदारी घेत होता. युसूफचा आयसी-814 प्लेन कंधार हाईजॅक प्रकरणातही सहभाग होता.
"ऑपरेशन सिंदूरचं उद्दिष्ट फक्त दहशतवाद्यांचा खात्मा करणं आहे. आपण १०० दहशतवाद्यांचा खात्मा केला" असल्याचं घई यांनी म्हटलं आहे. तसेच दहशतवाद्यांचे अड्डे उडवून दिल्याचे पुरावे दाखवले. दहशतवादी हल्ल्याला लष्कराने चोख प्रत्युत्तर दिलं. यामध्ये मुदस्सर, हाफिज जमील आणि युसूफ अझहर असे तीन मोठे दहशतवादी मारले गेले आहेत.