ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी केंद्र सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एक मोठी अपडेट दिली आहे. ऑपरेशन सिंदूर अजून संपलेले नाही, असे संरक्षण मंत्री म्हणाले. या हवाई हल्ल्यात किमान १०० दहशतवादी मारले गेलयाचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. सर्वपक्षीय बैठकीनंतर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनीही याची पुष्टी केली आहे. बुधवारी रात्री भारतीय लष्कराच्या हवाई हल्ल्यात पाकिस्तान आणि पीओकेमधील किमान ९ दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त झाले. या अहवालात असे म्हटले आहे की, दहशतवाद्यांचे किमान असे १२ अड्डे अजूनही शिल्लक आहेत.
सर्वपक्षीय बैठकीनंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, संकटाच्या या काळात आम्ही सरकारसोबत आहोत. दरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, "जर पाकिस्तानने हल्ला केला तर भारत त्याला प्रत्युत्तर देईल. मात्र, सध्या या कारवाईबद्दल फारशी तांत्रिक माहिती देता येणार नाही." सर्वपक्षीय बैठकीनंतर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, राजकीय नेत्यांनी या कारवाईबद्दल सशस्त्र दलांचे अभिनंदन केले.
सर्वपक्षीय बैठकीत राहुल गांधी काय म्हणाले?पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ ठिकाणी भारतीय सशस्त्र दलांनी केलेल्या कारवाईची माहिती सरकारने सर्व राजकीय पक्षांना दिली आहे, असे मल्लिकार्जुन खरगे यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत सांगितले. ते म्हणाले की, "राष्ट्रीय सुरक्षेचा हवाला देत सरकारने म्हटले आहे की, ते सध्या काही गोपनीय माहिती सार्वजनिक करू शकत नाही. अशा संकटाच्या काळात आम्ही सरकारवर यासाठी दबाव आणणार नाही, राष्ट्रीय हितासाठी सरकारसोबत उभे आहोत."
यावेळी बोलताना संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, "राजकीय पक्ष हे जनतेचा आवाज आहेत आणि सर्व नेते एका सुरात बोलत आहेत आणि हे सरकारचे यश आहे. ऑपरेशन सिंदूर नंतर सतत घडामोडी घडत आहेत आणि म्हणूनच अधिकाऱ्यांना बैठकीसाठी बोलावण्यात आलेले नाही." पुढील कारवाईबाबत राजकीय पक्षांशीही चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.