भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेला तणाव अद्यापही सुरू आहे. दरम्यान, आज पाकिस्तानी ड्रोननी भारताच्या हद्दी पुन्हा घुसखोरी केल्याचे समोर आले आहे. जम्मू, सांबा आणि पठाणकोट विभागांमध्ये पाकिस्तानी ड्रोन दिसून आले. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून जम्मूसह उधमपूर भागात पूर्णपणे ब्लॅकआऊट करण्यात आलं आहे. तसेच भारताच्या हवाई संरक्षण प्रणालीने यापैकी अनेक ड्रोन नष्ट केल्याने स्फोटांचा आवाज येत आहे.
आज दिवस मावळल्यानंतर जम्मूमध्ये सारन वाजू लागले होते. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून दुकान आणि बाजार बंद करण्यात आले. तसेच अनेक भागांतील वीजपुरवठाही खंडित करण्यात आला. याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. सुरुवातीला उरी आणि नंतर तंगधार आणि कुपवाडा सेक्टरमध्ये पाकिस्तानने गोळीबार केला. पाकिस्तानकडून तोफांचा भडीमार करण्यात येत आहे. तसेच इतरही हत्यारांचा वापर केला जात आहे. पाकिस्तानच्या या कारवाईमुळे आजूबाजूच्या परिसरात अलर्ट जारी करण्यात आला आहे.