लोकसभेमध्ये कालपासून ऑपरेशन सिंदूरवरून सुरू असलेल्या चर्चेमध्ये भारताने अचानक मान्य केलेल्या युद्धविरामाचा निर्णय केंद्रस्थानी राहिला होता. तसेच भारताने युद्धविरामाचा निर्णय हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सांगण्यावरून घेतला का? असा सवाल विरोधी पक्षांकडून विचारण्यात येत होता. या सर्व प्रश्नांची उत्तरं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेला उत्तर देताना दिलं. जगातील कुठल्याही नेत्याने भारताला ऑपरेशन सिंदूर रोखण्यास सांगितलं नव्हतं, असं स्पष्ट उत्तर नरेंद्र मोदी यांनी दिलं.
ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, जगातील कुठल्याही नेत्याने भारताला ऑपरेशन सिंदूर रोखण्यास सांगितलं नाही. त्याचदरम्यान, ९ मे रोजी रात्री अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वान्स यांनी माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला होता. मात्र माझी तेव्हा लष्कराच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू होती. त्यामुले मला त्यांचा फोन उचलता आला नाही. त्यानंतर मी त्यांना फोन केला. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की, पाकिस्तान मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहे. तेव्हा मी त्यांना सांगितलं की, पाकिस्तानने अशी आगळीक केली तर ती त्यांना खूप महागात पडेल. तर पाकिस्तानने हल्ला केला तर आम्ही त्यांच्यावर त्यापेक्षा मोठा हल्ला करू. गोळीचं उत्तर हे गोळ्याने दिलं जाईल, असं मी त्यांना सांगितलं होतं.
नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, त्यानंतर ९ मेच्या रात्रीपासून १० मेच्या सकाळपर्यंत आम्ही जोरदार हल्ला करून पाकिस्तानची सैन्यशक्ती नष्ट केली. हेच आमचं प्रत्युत्तर होतं. नऊ मे रोजी मध्यरात्रीपासून दहा मे रोजी सकाळपर्यंत आमच्या क्षेपणास्त्रांनी पाकिस्तानच्या प्रत्येक ठिकाणावर हल्ला केला. त्यामुळे अखेरीस पाकिस्तानला गुडघे टेकणं भाग पडलं. जेव्हा पाकिस्तानवर तगडा प्रहार केला गेला. तेव्हा पाकिस्तानने डीजीएमओंना फोन करून आता पुरे झालं, आता हल्ला थांबवा,अशी विनवणी केली, असे मोदींनी सांगितले.
तसेच १० मे रोजी भारताने ऑपरेशन सिंदूरअंतर्गत सुरू असलेली कारवाई थांबवण्याची घोषणा केली तेव्हा त्याबाबत वेगवेगळ्या गोष्टी बोलल्या गेल्या. हा तोच प्रोपेगेंडा होता जो सीमेपलीकडून पसरवण्यात आला होता. काही लोक लष्कराकडून सांगण्यात आलेल्या गोष्टींऐवजी पाकिस्तानच्या खोट्या प्रचाराला पुढे रेटत होते. मात्र भारताची भूमिका स्पष्ट होती, असेही नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले.