नवी दिल्ली - जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने घेतला आहे. भारतीय सैन्याने मंगळवारी रात्री ९ दहशतवादी ठिकाणांवर एअर स्ट्राईक केले. या एअर स्ट्राईकनंतर संरक्षण मंत्रालयाकडून निवेदन जारी करण्यात आले आहे. यात 'ऑपरेशन सिंदूर'चा हेतू केवळ दहशतवादी ठिकाणांना टार्गेट करणे होते. शेजारील राष्ट्राशी लढण्याच्या हेतूने हल्ला नव्हता असं भारताने म्हटलं आहे.
संरक्षण मंत्रालयाने मध्यरात्री जारी केलेल्या पत्रकात म्हटलंय की, काही वेळापूर्वी भारतीय सशस्त्र दलाने ऑपरेशन सिंदूरची सुरुवात केली. ज्यात पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर येथील दहशतवादी तळांना टार्गेट करण्यात आले. याच ठिकाणावरून भारताविरोधात दहशतवादी हल्ल्याची योजना बनवली जात होती आणि हल्ला घडवला जायचा. भारतीय सैन्याने एकूण ९ ठिकाणांना निशाणा बनवले. आमच्या सैन्याने कुणालाही उकसवलं नाही. कुठल्याही पाकिस्तानी सैन्याच्या छावण्यांना टार्गेट केले नाही. भारताने टार्गेट निवडीपर्यंत संयम पाळला होता असं म्हटलं आहे.
तसेच भारताने हे पाऊल पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उचललं आहे. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. ऑपरेशन सिंदूर बाबत लवकरच सविस्तर माहिती देण्यात येईल असंही संरक्षण मंत्रालयाने सांगितले आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत रात्री दीडच्या सुमारास पाकिस्तान आणि पीओकेमधील ९ दहशतवादी ठिकाणांवर एअर स्ट्राईक केले. हा हल्ला बहावलपूर, कोटली, मुजफ्फराबाद इथे करण्यात आला. २२ एप्रिलला काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी बैसरन खोऱ्यात पर्यटकांना टार्गेट केले होते. या हल्ल्याचा बदला घेणार असा इशारा भारताने दिला होता.
हल्ला झालेली ठिकाणे कोणती?
- बहावलपूर - आंतरराष्ट्रीय सीमेपासून जवळपास १०० किमी अंतरावरील हे ठिकाण असून तिथे जैश ए मोहम्मदचं मुख्यालय होते, जे भारतीय सैन्याने उद्ध्वस्त केले.
- मुरीदके - हे दहशतवादी ठिकाण बॉर्डरपासून ३० किमी अंतरावर होते, तिथे लश्कर ए तोयबाचे सेंटर होते, जे २६/११ मुंबई हल्ल्याशी जोडले होते.
- गुलपूर - हे दहशतवादी ठिकाणी LOC पासून ३५ किमी अंतरावर होते.
- लश्कर कॅम्प सवाई - पीओकेच्या तंगाधार सेक्टरच्या ३० किमीवर अंतरावर हे ठिकाण होते.
- बिलाल कॅम्प - जैश ए मोहम्मदचं लॉन्चपॅड, हे ठिकाण दहशतवाद्यांना सीमेपलीकडे पाठवण्यासाठी वापरले जायचे
- कोटली- एलओसीपासून १५ किमी अंतरावरील लश्कर ए तोयबाचा कॅम्प, याठिकाणी ५० हून अधिक दहशतवादी ट्रेनिंग घेत होते
- बरनाला कॅम्प - LOC पासून १० किमी अंतरावर हे ठिकाण आहे
- सरजाल कॅम्प - सांबा कठुआच्या समोर इंटरनॅशनल बॉर्डरपासून ८ किमी अंतरावर जैशचं प्रशिक्षण केंद्र होते
- मेहमूना कॅम्प - हे हिज्बुल मुझाहिद्दीनचे प्रशिक्षण सेंटर होते, जे बॉर्डरपासून १५ किमी अंतरावर होते.