Operation Sindoor in Marathi: पाकिस्तानात कटकारस्थान रचून भारतात रक्तपात घडवणाऱ्या आणि निष्पाप नागरिकांचे प्राण घेणाऱ्या दहशतवादी संघटनांना भारताने त्यांच्याच भाषेत उत्तर दिले. ७ मे रोजीच्या रात्री भारतीय लष्कराने दहशतवाद्यांची झोपच उडवली. अवघ्या २५ मिनिटांत ९ ठिकाणांना जमीनदोस्त करत लष्कराने ऑपरेशन सिंदूर यशस्वी केले. या कारवाई तब्बल ९० दहशतवादी मारले गेले आहेत. ऑपरेशन सिंदूरमध्ये कोणती ठिकाणे उद्ध्वस्त करण्यात आली... वाचा...
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भारतात आतापर्यंत झालेल्या अनेक हल्ल्यांचे भारताने ७ मे रोजीच्या रात्री उत्तर दिले. भारतीय लष्कराने केलेल्या हवाई हल्ल्यात दहशतवाद्यांचे अड्डे भूईसपाट झाले. लष्कराच्या तिन्ही दलाने केलेल्या संयुक्त ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरमधील ९ ठिकाणांवर हवाई हल्ले करण्यात आले.
दहशतवाद्यांची ती नऊ ठिकाणे कोणती?
केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, "ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीरमधील दहशतवाद्यांचे वास्तव्य असलेल्या आणि प्रशिक्षण दिले जाणाऱ्या ठिकाणांनाच लक्ष्य करण्यात आले. याच ठिकाणांवर भारतात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचे कट रचले गेले. त्यासाठी दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले गेले होते."
वाचा >>"यापुढेही भारतावर हल्ल्याची शक्यता, म्हणून उत्तर देणे गरजेचे होते"
६ आणि ७ मेच्या रात्री १ वाजून ५ मिनिटांनी ऑपरेशन सिंदूर सुरु करण्यात आले होते. लष्कराकडून मुझफ्फराबाद, बहावलपूर, मुरीदके, सियालकोट, कोटली, बाग, गुलपूर, भिंबर आणि शकरगढ येथील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला करण्यात आला.
ऑपरेशन सिंदूर ९० दहशतवाद्यांचा खात्मा
भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरातील जैश ए मोहम्मद आणि इतर दहशतवादी संघटनांचे अड्डे उद्ध्वस्त केले. नऊ ठिकाणी करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यामध्ये ९० दहशतवादी मारले गेले आहेत.
भारतीय लष्कराच्या अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी यांनी सांगितले की, मागील तीन दशकांपासून पाकिस्तानात दहशतवाद्यांचे अड्डे उभे केले जात आहे. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये हे अड्डे पसरलेले आहेत.