ऑपरेशन सिंदूरवरून भारतीय लष्कराचे उप-प्रमुख लेफ्टनंट जनरल राहुल आर. सिंह यांचे मोठे वक्तव्य आले आहे. या लढाईतून आपल्याला खूप सारे धडे शिकलो, असे ते म्हणाले आहेत.
फिक्कीच्या एका कार्यक्रमात सिंह यांनी मोठा खुलासा केला आहे. युद्ध एका सीमेवर होत होते पण विरोधक तीन होते, असे सिंह म्हणाले. यावेळी त्यांनी चीनवर मोठे भाष्य केले आहे. पाकिस्तान भारताविरोधात लढत होता पण चीन हा त्याला सर्व मदत करत होता. चीनने सॅटेलाईट वळविले होते, याच आश्चर्यकारक असे काही नव्हते. कारण गेल्या पाच वर्षांत पाकिस्तानने जी जी शस्त्रे वापरली त्यापैकी ८१ टक्के शस्त्रे चीनची होती, असे त्यांनी सांगितले.
चीन आपल्या शस्त्रांची चाचणी इतर शस्त्रांबरोबर वापरून घेत आहे. चीन आपल्या या शस्त्रांची चाचणी एखाद्या जिवंत प्रयोगशाळेसारखी करत आहे, असा गौप्यस्फोट सिंह यांनी केला. तसेच ऑपरेशन सिंदूरवेळी भारताविरोधात तुर्कीनेही महत्त्वाची भूमिका बजावली. तुर्की सतत पाकिस्तानसोबत होता, असेही ते म्हणाले.
जेव्हा भारत आणि पाकिस्तानमध्ये डीजीएमओ स्तरावरील चर्चा सुरू होती, तेव्हा पाकिस्तानला चीनकडून आमच्या वेक्टरचे लाईव्ह अपडेट्स मिळत होते. भविष्यात अशा आव्हानांना तोंड देण्यासाठी आम्हाला एक मजबूत हवाई संरक्षण प्रणालीची आवश्यकता आहे, असे ते म्हणाले.