पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने 'ऑपरेशन सिंदूर' करून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळं उद्ध्वस्त करून टाकली. मात्र, यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने भारतावर हल्ले करण्यास सुरुवात केली. पाकिस्तानने भारताविरोधात 'ऑपरेशन बुनयान-अल मारसुस' सुरू केले. परंतु, अवघ्या आठ तासांतच पाकिस्तानने गुडघे टेकले. पाकिस्तानला अमेरिकेला हाताशी धरून युद्धविरामाचा प्रस्ताव मांडावा लागला. या संघर्षात भारतीय सैन्याने प्रचंड शौर्य दाखवले.
भारतीय हवाई दलाने पाकिस्तानवर असे चार शक्तिशाली हवाई हल्ले केले की, पाकिस्तानला गुडघे टेकावे लागले. भारताने राफेल आणि सुखोईवरून डागलेल्या क्षेपणास्त्रांनी पाकिस्तानच्या चकलाला, जेकोबाबाद आणि भोलारी एअर बेसला हादरा दिला. पहिल्याच हल्ल्यात पाकिस्तानचे नॉर्दर्न एअर कमांड उद्ध्वस्त झाले.
पहिल्या हल्ल्यात नूर खान एअरबेस उद्ध्वस्त!भारतीय राफेल लढाऊ विमानांमधून डागण्यात आलेले स्काल्प क्षेपणास्त्रे आणि सुखोई-३०मधून डागण्यात आलेले ब्रह्मोस क्षेपणास्त्रे इस्लामाबादजवळील चकलाला एअरबेस (नूर खान एअरबेस) उद्ध्वस्त करून गेली. चकलाला हे पाकिस्तानच्या नॉर्दर्न एअर कमांडचे मुख्य नियंत्रण केंद्र होते, जे पहिल्या हल्ल्यातच नष्ट झाले.यामुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या हल्ल्यात पाकिस्तानची तयारी कोलमडली.
पुढील हल्ल्यांत पाकिस्तानी हवाई संरक्षण प्रणाली, विमाने आणि जमिनीवरील मालमत्तांना लक्ष्य करण्यात आले. भारतीय सैन्याची अचूकता इतकी जबरदस्त होती की, शत्रूचे प्रतिहल्ला करण्याचे प्रयत्न स्वतःच चिरडले गेले.
चौथ्या हल्ल्यात जेकबाबाद आणि भोलारी उद्ध्वस्त!भारतीय हवाई दलाच्या शेवटच्या हल्ल्यात पाकिस्तानचे जेकबाबाद आणि भोलारी हवाई तळ पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. या दोन्ही तळांवरून पाकिस्तानला प्रत्युत्तरात्मक हल्ला अपेक्षित होता, परंतु भारतीय क्षेपणास्त्रांच्या माऱ्याने त्यांना गुडघे टेकायला लावले. "ऑपरेशन सिंदूर" मध्ये सुदर्शन एस-४०० या हवाई संरक्षण प्रणालीने देखील उत्कृष्ट कामगिरी केली.