Operation Sindoor: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात काल(दि.२८) पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर दीर्घ चर्चा झाली. यादरम्यान, लोकसभेत बराच गोंधळ झाला. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तानवरील कारवाईची सविस्तर माहिती दिली. तसेच, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने युद्धविराम झाल्याच्या विरोधकांच्या आरोपांचे खंडन केले. भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामात अमेरिकेचा हस्तक्षेप नव्हता, असे त्यांनी सांगितले.
मोदी-ट्रम्प यांच्यात कुठलीही चर्चा नाहीपरराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की, "पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताला एकच संदेश होता की, आम्ही दहशतवादाविरुद्ध स्वतःचे रक्षण करण्याचा आमचा अधिकार वापरत आहोत. ७ मे रोजी ज्या ठिकाणी हल्ला झाला, ते दहशतवादी मुख्यालये आणि पायाभूत सुविधा होत्या. आम्ही पाकिस्तानवर नाही, तर दहशतवादी तळांवर हल्ले केले. पुढे पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम जाहीर करण्यात आला. यामध्ये कोणीही मध्यस्थी केली नाही. २२ एप्रिल ते १७ जून दरम्यान ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्यात कोणतीही चर्चा झाली नाही."
जयशंकर पुढे म्हणाले, "आम्ही कधीही अणुबॉम्बच्या धमक्यांना बळी पडणार नाही. आमचा हेतू फक्त पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणांवर हल्ले करण्याचा होता. मात्र, पाकिस्तानी सैन्याने आपल्या लष्करी तळांवर हल्ले केल्यामुळे, आम्हाला त्यांना प्रत्युत्तर द्यावे लागले. यापुढेही पाकिस्तानने अशाप्रकारचे हल्ले करण्याचा प्रयत्न केला, तर आम्हीदेखील पाकिस्तानी सैन्यावर तशाच प्रकारचे हल्ले करत राहू," असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
पहलगामनंतर संपूर्ण जग भारतासोबत"आम्ही पाकिस्तानचा खरा चेहरा जगाला दाखवला. पहलगामनंतर जग भारतासोबत होते. पहलगाम हल्ल्यावर जगाने भारताच्या बाजूने काय म्हटले? हे विरोधी पक्ष विचारत आहेत. मी सांगू इच्छितो की, जर्मन परराष्ट्र मंत्री म्हणाले की, भारताला दहशतवादाविरुद्ध स्वतःचे रक्षण करण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि आमचा भारताला पाठिंबा आहे. फ्रान्स आणि युरोपियन युनियननेही असेच म्हटले. क्वाड आणि ब्रिक्स सारख्या बहुपक्षीय गटांनी २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्याचा निषेध केला."
जयशंकर पुढे म्हणतात, "२५ एप्रिल रोजी सुरक्षा परिषदेच्या सदस्यांनीही पहलगाम हल्ल्याचा तीव्र निषेध केला. त्यांनी यावर भर दिला की, कोणत्याही स्वरुपात दहशतवाद हा आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेसाठी सर्वात गंभीर धोक्यांपैकी एक आहे. ९ मे रोजी अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हेन्स यांनी पंतप्रधानांना फोन करून सांगितले की, पाकिस्तान हल्ला करणार आहे. पण, पंतप्रधान मोदींनी स्पष्टपणे सांगितले होते की, जर पाकिस्तानने हल्ला केला, तर भारत गप्प बसणार नाही. पाकिस्तानमध्ये झालेल्या विध्वंसाचे सॅटेलाईट फोटोज सर्वांनी पाहिले. तुमच्यापैकी कोणाला वाटले होते का की, बहावलपूर आणि मुरीदके सारखे दहशतवादी अड्डे अशा प्रकारे उद्ध्वस्त होतील? मोदी सरकारने हे करुन दाखवले."
पाकिस्तानविरोधात अनेक कठोर निर्णय घेतले"पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी भारताने पाकिस्तानविरुद्ध कारवाई करताना अनेक कठोर निर्णय घेतले. यामध्ये सिंधू पाणी करार रद्द करणे, पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करणे, इस्लामाबाद उच्चायोगातील राजदूतांना पर्सना नॉन ग्राटा घोषित करणे आणि अटारी सीमा बंद करणे यांचा समावेश आहे. भारतीय नागरिकांची सुरक्षित सुटका कठीण परिस्थितीत करण्यात आली आणि हे अभियान भारताच्या क्षमता आणि वचनबद्धतेचे प्रतिबिंबित करते. पाकिस्तानी भूमीतून वाढणाऱ्या दहशतवादाला भारताचा प्रतिसाद केवळ ऑपरेशन सिंदूरपुरता मर्यादित राहणार नाही. भारतातील पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसा निर्बंधही सुरूच राहील," असेही जयशंकर यांनी स्पष्ट केले.
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले