भारत-पाकिस्तान दरम्यानचे चार दिवसांच्या युद्धाचा निकाल भारताच्या पारड्यात पडलेला आहे. अत्यंत घातक एअरस्ट्राईक झाल्याने पाकिस्तानने सीझफायर करण्याची विनंती भारताला केली होती. अद्याप हा युद्धविराम सुरु आहे. परंतू, याच्या आड पाकिस्तान लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांसोबत मिळून एलओसीपार मोठ्या हालचाली करत आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर ६ मेच्या रात्री भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर जोरदार हल्ले चढविले होते. यात हाफिज सईदच्या कुटुंबातील १० जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर पाकिस्तानने शेकडो ड्रोन भारतात पाठविले होते, भारताच्या सुदर्शन चक्र डिफेन्स सिस्टीमने ते पाडले होते. यानंतर भारताने पाकिस्तानच्या ११ एअरबेसवर हल्ला चढविला होता. यामुळे नामोहरम झालेला पाकिस्तान भारताला शरण आला होता. आता या शरणागतीच्या काळात पाकिस्तान भारताविरोधात पुन्हा सक्रीय झाला आहे.
नुकत्याच आलेल्या एका रिपोर्टमध्ये दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबाचे दहशतवादी पाकिस्तानी लष्करासोबत दिसू लागले आहेत. शनिवारी पाकिस्तानी लष्करासोबत लष्कर ए तोयबाचे दहशतवादी एलओसीवर आले होते. न्यूयॉर्क टाईम्सचे पत्रकार ताहा सिद्दीकी यांनी एक्सवर याची माहिती दिली आहे, असे फायनान्शिअल एक्स्प्रेसच्या वृत्तात म्हटले आहे. सिद्दीकी यांच्यानुसार पाकिस्तानी सैन्याचे अधिकारी आणि लष्करचे कमांडर यांची पीओकेमध्ये बैठक झाली, यानंतर ते एलओसीवर गेले. एलओसीच्या खालून बोगदा बनवून दहशतवाद्यांना सीमापार भारतात पाठविण्याचा त्यांचा प्लॅन असल्याचे सिद्दीकी यांनी म्हटले आहे.
यामुळे बीएसएफने एलओसीवर गस्त वाढविली आहे. यापूर्वीही बोगदे बनवून भारतात दहशतवादी घुसल्याचे प्रकार समोर आलेले आहेत. इस्लामाबादने अशाप्रकारचे खोल सुरुंग खोदण्यासाठी माजी सैनिकांना एलओसीवर तैनात केले आहे. यामुळे भारतीय सैन्याला अशाप्रकारचे खोल सुरुंग शोधण्याचे आदेश देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांचे हवाल्याने या वृत्तात म्हटले आहे.