भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव कायम आहे. याच दरम्यान, पाकिस्तानने भारतातील अनेक शहरांवर क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. जो सैन्याने हाणून पाडला. सरकारच्या सर्वपक्षीय बैठकीत उपस्थित असलेले आम आदमी पक्षाचे (आप) राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी महत्त्वाची माहिती दिली. "ऑपरेशन सिंदूर सुरूच आहे. पूंछ आणि राजौरीमध्ये घडलेल्या घटनेत लोक मारले गेले. सरकारने स्पष्ट केलं आहे की, पाकिस्तान जिथे जिथे नापाक कारवाया करेल तिथे त्यांना योग्य उत्तर दिले जाईल" असं म्हटलं आहे.
वृत्तसंस्था पीटीआयशी बोलताना संजय सिंह म्हणाले, "सरकारने माहिती दिली की पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूर आणि जालंधरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, परंतु ते पाडण्यात आले." भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूरनंतर, ०७-०८ मे २०२५ च्या रात्री, पाकिस्तानने ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून भारतातील अनेक शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
"१०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला”
"आज सर्वपक्षीय बैठक झाली. यामध्ये संरक्षणमंत्र्यांनी सांगितलं की, ९ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ले करण्यात आले. टार्गेटेट हल्ला करण्यात आला. तिथे १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. संपूर्ण जगाने पाहिलं की पाकिस्तानी सैन्य दहशतवाद्यांसह आहे. मसूद अझहरच्या नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारात पाकिस्तानी सैन्याचे अधिकारी उपस्थित होते. जगाने पाकिस्तानला दहशतवादी देश घोषित करावे. सर्वपक्षीय बैठकीत पहलगाम घटनेत सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना संपवण्याची मागणी करण्यात आली. जेणेकरून बदला घेता येईल" असं संजय सिंह यांनी म्हटलं आहे.
"ऑपरेशन सिंदूर हे वीर पत्नींच्या अश्रूंचं उत्तर, आमचं कुंकू आता शौर्य आणि..."; ऐशन्या झाली भावुक
शुभम आणि ऐशन्या यांचं लग्न होऊन दोन महिनेही झाले नव्हते. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू झाला. या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या हल्ल्याला भारताने ऑपरेशन सिंदूर करत चोख प्रत्युत्तर दिलं. लष्कराने दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. ऐशन्याने यावर प्रतिक्रिया दिली आहे. "ऑपरेशन सिंदूर हे आमच्या वीर पत्नींच्या अश्रूंचं उत्तर आहे, ज्यामध्ये शुभम आणि माझ्यासारख्या इतर महिलांचे पती दहशतवादी हल्ल्यात मारले गेले. आमचं कुंकू आता शौर्य आणि देशभक्तीचा संकल्प बनलं आहे" असं म्हटलं.