Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 12:28 IST2025-07-29T12:26:13+5:302025-07-29T12:28:54+5:30
श्रीनगरजवळच्या हरवान परिसरातील लिडवासच्या घनदाट जंगलात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार सुलेमानीसह तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं.

Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
जम्मूमधील भारतीय सुरक्षा दलांना मोठं यश मिळालं आहे. श्रीनगरजवळच्या हरवान परिसरातील लिडवासच्या घनदाट जंगलात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार सुलेमानीसह तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. ‘ऑपरेशन महादेव’ असं या मोहिमेला नाव देण्यात आलं होतं. गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार, १८ जुलै रोजी जम्मू-काश्मीरमधील दाचीगाम राष्ट्रीय उद्यानाजवळ एक संशयास्पद संभाषण ऐकण्यात आलं आणि त्यानंतर ‘ऑपरेशन महादेव’ सुरू करण्यात आलं.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली, कारण या संदेशातून हे लक्षात आलं होतं की वापरण्यात आलेलं उपकरण २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्याशी संबंधित आहे. रविवारी मध्यरात्री २ वाजता टी८२ अल्ट्रासेट सक्रिय झालं. टी८२ हे एक अत्यंत दुर्मिळ, एन्क्रिप्टेड संवाद उपकरण आहे. या उपकरणातून सिग्नल मिळाल्यामुळे दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचा मार्ग मोकळा झाला. टी८२च्या सिग्नल्समुळे सुरक्षा दलांना दहशतवाद्यांचं नेमकं ठिकाण शोधण्यात यश मिळालं.
जवळपास ११ दिवसांच्या शोधमोहिमेनंतर सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास २४ राष्ट्रीय रायफल्स आणि ४ पॅरा कमांडोच्या संयुक्त पथकाने तीन ‘अतिशय महत्त्वाच्या पाकिस्तानी दहशतवाद्यांना’ घेरलं आणि त्यांना ठार केलं. यात सुलेमानी शाह नावाच्या एका लष्कर-ए-तैयबा (LeT) सदस्याचा समावेश होता, जो पहलगाम हल्ल्याचा मुख्य शूटर आणि सूत्रधार असल्याचा संशय होता.
दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यांची ओळख पटवणार
हरवानच्या मुलनार परिसरात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सोमवारी सकाळी ११ वाजता चकमक सुरू झाली. २४ राष्ट्रीय रायफल्स आणि ४ पॅरा युनिटच्या संयुक्त पथकाने तातडीने कारवाई करत दहशतवाद्यांवर जोरदार गोळीबार केला, यात तीन सशस्त्र दहशतवादी ठार झाले.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या दहशतवाद्यांची ओळख परवेज अहमद जोथर आणि बशीर अहमद जोथर यांच्यामार्फत पटण्याची शक्यता आहे, ज्यांना गेल्या महिन्यात एनआयएने पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आश्रय दिल्याप्रकरणी अटक केली होती. एनआयएच्या तपासात असं समोर आलं होतं की, परवेज आणि बशीर यांनी हल्ल्यापूर्वी हिल पार्कमधील एका हंगामी झोपडीत (ढोक) तीन सशस्त्र दहशतवाद्यांना जाणूनबुजून आश्रय दिला होता. ही माहिती एजन्सीने गेल्या महिन्यात दिलेल्या निवेदनात दिली होती.
सुलेमानी शाह पहलगाम हल्ल्याचा मुख्य संशयित
पहलगाममधील एका सुंदर पार्कमध्ये २५ पर्यटक आणि एका स्थानिक घोडेवाल्याची गोळ्या घालून हत्या झाल्यानंतर सुलेमानी शाहचं नाव मुख्य संशयित म्हणून समोर आलं होतं. या प्रकरणाचा तपास करणारी राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) देखील त्याचा शोध घेत होती. एका अधिकाऱ्याच्या मते, तो पाकिस्तानी लष्कराचा माजी कमांडो असल्याचा संशय आहे. सुरक्षा दलांनी दाचीगामच्या हरवान परिसरातील दहशतवाद्यांच्या ठिकाणावरून एक एम४ कार्बाइन आणि दोन एके४७ रायफल, ग्रेनेड, दारूगोळा, तसेच खाण्यापिण्याचे सामानही जप्त केलं आहे. ठार झालेल्या इतर दोन दहशतवाद्यांची ओळख अद्याप अधिकृतपणे उघड करण्यात आलेली नाही.