ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 14:09 IST2025-07-29T14:06:04+5:302025-07-29T14:09:10+5:30

Operation Mahadev : जम्मू-काश्मीरमधील ऑपरेशन महादेवमध्ये ठार झालेल्या तिन्ही दहशतवाद्यांची संपूर्ण 'कुंडली' आता समोर आली आहे.

Operation Mahadev: 'Kundli' of all three terrorists in Pahalgam attack revealed! | ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!

ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!

जम्मू-काश्मीरमधील ऑपरेशन महादेवमध्ये ठार झालेल्या तिन्ही दहशतवाद्यांची संपूर्ण 'कुंडली' आता समोर आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईत सुलेमानी, अफगान आणि जिब्रान या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. भारतीय लष्कर, केंद्रीय सुरक्षा दल आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या या ऑपरेशनमध्ये त्यांना ठार करण्यात आले.

संसदेत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान अमित शाह यांनी सांगितलं की, "या दहशतवाद्यांकडून ज्या गोळ्या मिळाल्या आहेत, त्याच गोळ्यांचा वापर पहलगाममध्ये निष्पाप लोकांना मारण्यासाठी करण्यात आला होता."

सुलेमान, जिब्रान-अफगान यांची संपूर्ण कुंडली

सुलेमान: पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेला सुलेमान हा पाकिस्तानी वंशाचा होता. लष्कर-ए-तैयबामध्ये सामील होण्यापूर्वी सुलेमान पाकिस्तानी सैन्यात कमांडर होता. त्याला पहलगाम हल्ल्यापूर्वी पीओकेमध्ये (पाकव्याप्त काश्मीरमध्ये) प्रशिक्षण देण्यात आले होते. सुलेमान २०२२पासून जम्मू-काश्मीरमध्ये सक्रिय होता.

जिब्रान: जिब्रान हा लष्कर-ए-तैयबाचा 'ए-ग्रेड'चा कमांडर होता. पाकिस्तानी वंशाचा जिब्रान जम्मू-काश्मीरमधील अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होता. गेल्या वर्षी सोनमर्ग येथे झालेल्या घटनेची जबाबदारीही जिब्रानने स्वीकारली होती.

अफगान: अफगान नावाचा दहशतवादीही पाकिस्तानचाच रहिवासी होता. अफगानही लष्कर-ए-तैयबाचा 'ए-श्रेणी'चा कमांडर होता. अफगाननेही पहलगाममध्ये लोकांवर गोळ्या झाडल्या होत्या. आरोप आहे की यानंतर अफगानने इतर साथीदारांसोबत तिथे जश्नही साजरा केला होता.

तिघांना कसे घेरले?

अमित शाह यांच्या मते, ज्या दिवशी कॅबिनेट कमिटी ऑफ सिक्युरिटीची (CCS) बैठक होती, त्याच दिवशी या तिन्ही दहशतवाद्यांना बाहेर पडू द्यायचे नाही, असा निर्णय झाला होता. त्यानंतर लष्कराने तातडीने घेराबंदी सुरू केली.

लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी आधी या तिघांचे ठिकाण शोधले आणि त्यानंतर तिघांविरोधात ऑपरेशन सुरू केले. पावसामुळे हे दहशतवादी जास्त वेळ टिकू शकले नाहीत. तिन्ही दहशतवादी लष्कराच्या ऑपरेशनमध्ये मारले गेले. तिघांच्या जवळून पाकिस्तानी चॉकलेट्स आणि शस्त्रे सापडली आहेत.

एप्रिल महिन्यात पहलगाममध्ये काय घडले होते?

पहलगामच्या बैसरन घाटात २२ एप्रिल रोजी पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबाच्या ३ दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांना गोळ्या घालून ठार केले होते. सरकारच्या माहितीनुसार, गोळीबार करण्यापूर्वी दहशतवाद्यांनी पर्यटकांचा धर्म विचारला होता. या घटनेची जगभरातून निंदा करण्यात आली होती.

या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारतीय लष्कराने ६-७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानस्थित ९ दहशतवादी ठिकाणांवर स्ट्राइक केला होता. संरक्षणमंत्र्यांच्या माहितीनुसार, या स्ट्राइकमध्ये १००हून अधिक दहशतवादी मारले गेले होते.

Web Title: Operation Mahadev: 'Kundli' of all three terrorists in Pahalgam attack revealed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.