या देशावर संविधानच राज्य करेल; मोहन भागवतांचे नाव घेत राहुल गांधींचा BJP-RSS वर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 15:49 IST2025-02-03T15:48:54+5:302025-02-03T15:49:25+5:30

'कोणतीही शक्ती संविधानाला हात लावण्याची हिंमत करू शकत नाही.'

Only the Constitution will rule this country; Rahul Gandhi attacks on BJP and RSS | या देशावर संविधानच राज्य करेल; मोहन भागवतांचे नाव घेत राहुल गांधींचा BJP-RSS वर हल्लाबोल

या देशावर संविधानच राज्य करेल; मोहन भागवतांचे नाव घेत राहुल गांधींचा BJP-RSS वर हल्लाबोल

Rahul Gandhi in Parliament :संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज(3 फेब्रुवारी) राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर चर्चा करतेवेळी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मेक इन इंडिया, निवडणूक आयोग, रोजगारी, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूका...अशा विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचाही मुद्दा उपस्थित केला. 

मोहन भागवतांवर टीका
'मला आठवतंय निवडणुकीपूर्वी तुम्ही सर्वजण (भाजप) '400 पार' म्हणत होता. सत्ता आल्यावर संविधान बदलणार, अशी भाषा तुम्ही वापरली. पण, निवडून आल्यानंतर पंतप्रधानांना संविधानासमोर डोके टेकवावे लागले. हे पाहून मला खूप आनंद झाला. सर्व काँग्रेससाठी हा अभिमानाचा क्षण होता. आम्ही पंतप्रधानांना आणि संपूर्ण देशाला सांगितले होते की, कोणतीही शक्ती याला हात लावण्याची हिंमत करू शकत नाही. मला माहितेय की, आरएसएसने हे कधीही स्वीकारले नाही. मोहन भागवत म्हणाले की, भारताला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले नाही. पण, आम्ही तुमचे स्वप्न कधीही पूर्ण होऊ देणार नाही. हे संविधान नेहमीच भारतावर राज्य करेल

निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचा डेटा मागितला
महाराष्ट्राच्या निकालाचा संदर्भ देत राहुल गांधी म्हणाले की, 'लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीने बाजी मारली. पण लोकसभा निवडणुकीपूर्वी हिमाचल प्रदेशच्या लोकसंख्येइतके नवीन मतदार यादीत जोडले गेले. विधानसभा निवडणुकीदरम्यान 70 लाख नवीन मतदारांची भर पडली. महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षात जेवढे जोडले गेले, त्यापेक्षा गेल्या पाच महिन्यांत जास्त जोडले गेले. मी कोणतेही आरोप करत नाही. मी फक्त असे म्हणत आहे की, काही तरी समस्या आहे. लोकसभा मतदार यादी, नावे आणि पत्ते देण्याची मागणी आम्ही निवडणूक आयोगाकडे केली होती,' असेही राहुल गांधींनी यावेळी सांगितले.

भगवान शिवाचा उल्लेख 
भगवान शिवाचा उल्लेख करत राहुल गांधी म्हणाले की, 'देशाला आपल्या जुन्या वारशाशी जोडले गेले पाहिजे. तुम्ही सरदार पटेलांचा उल्लेख करता, पण त्यांची मूल्ये रोज चिरडता. तुम्ही आंबेडकरांबद्दल बोलता, त्यांची मूल्ये चिरडता. तुम्ही भगवान बुद्धांबद्दल बोलता, पण त्यांच्या मूल्यांवर विश्वास ठेवत नाही. तुम्ही नेहरुंबद्दल बोलता, नाही, नाही... तुमचा त्यांच्यावर विश्वास नाही.'

चीन आपल्या सीमेत घुसला कारण...
चीनने भारताच्या जमिनीवर कब्जा केल्याचा आरोप करत राहुल गांधी म्हणाले की, 'पंतप्रधानांनी आरोप फेटाळून लावले, पण लष्कराने सांगितले की, चीनच्या ताब्यात चार हजार चौरस किलोमीटर जमीन आहे. वस्तुस्थिती अशी आहे की, युद्ध हे औद्योगिक व्यवस्थेवर अवलंबून आहे आणि त्यात ते आपल्यापेक्षा पुढे आहेत. यामुळेच मेक इन इंडिया अपयशी ठरत असल्याने चीनने आपल्या देशात प्रवेश केला आहे.'

'आज मोबाईल फोन भारतात बनवला, असे आपण म्हणत असलो तरी, त्याचे पार्ट्स चीनमधून आले आहेत आणि इथे फक्त असेंबल केले आहेत. मेक इन इंडियाबद्दल पंतप्रधान जे बोलले ते चांगलेच आहे. पण उत्पादनात अपयश येत आहे. आम्ही पंतप्रधानांना दोष देत नाही, पंतप्रधानांनी प्रयत्न केला, कल्पना योग्य होती पण ते अपयशी ठरत आहेत. आज देशातील उत्पादन 60 वर्षांतील सर्वात खालच्या पातळीवर आहे,' अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. 

Web Title: Only the Constitution will rule this country; Rahul Gandhi attacks on BJP and RSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.