One Nation One Election Updates: मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर एक देश एक निवडणूक विधेयक मंगळवारी (१७ डिसेंबर) लोकसभेत मांडण्यात आले. पण, या विधेयकाच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपल्या खासदारांसाठी व्हीप जारी केला होता. तरीही २० खासदार गैरहजर होते. त्यामुळे भाजपकडून त्यांना आता नोटीस बजावली जाणार आहे.
लोकसभेत केंद्रीय मंत्री अर्जून राम मेघवाल यांनी संविधान (१२९ घटना दुरुस्ती) विधेयक २०२४ मांडले. या विधेयकाला विरोधकांकडून प्रचंड विरोध झाला. प्रचंड गदारोळातच हे विधेयक मांडण्यात आले. काँग्रेस आणि इथर विरोधी पक्षांनी या विधेयकाला कडाडून विरोध केला, तर शिवसेना, तेलगू देसम या एनडीएतील घटक पक्षानी पाठिंबा दिला.
मतदानाला गैरहजरी, भाजप पाठवणार नोटीस
एक देश एक निवडणूक विधेयक मांडले जाणार असल्याने भाजपने व्हीप जारी केला होता. सर्व खासदारांनी सभागृहात हजर राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र, भाजपचे २० पेक्षा जास्त खासदार गैरहजर होते. या खासदारांना आता नोटीस पाठवली जाणार असून, गैरहजरीचे कारण खासदारांना पक्षाला सांगावे लागणार आहे.
मोदी म्हणाले जेपीसीकडे पाठवा- अमित शाह
या विधेयकावरील चर्चेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सहभागी झाले. टीआर बालू यांच्या मागणीचा उल्लेख करत शाह म्हणाले, "जेव्हा मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे विधेयक आले होते. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः म्हणाले की, हे विधेयक जेपीसीकडे (संसदेची संयुक्त समिती) पाठवले पाहिजे आणि व्यवस्थित यांची पडताळणी झाली पाहिजे. वेळ वाया न घालवता मंत्री जर जेपीसीकडे पाठवण्यास तयार असतील, तर चर्चा संपेल. जेपीसीच्या रिपोर्टसह जेव्हा हे विधेयक मांडले जाईल, तेव्हा यावर सविस्तर चर्चा केली जाईल."