पश्चिम बंगालमधल्या कांकीनारामध्ये गावठी बॉम्बचा हल्ला, दोघांचा मृत्यू, चार जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 11:48 AM2019-06-11T11:48:24+5:302019-06-11T11:50:21+5:30

पश्चिम बंगालमधल्या कांकीनारा भागात गावठी बॉम्बच्या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

one man died in crude bomb attack at kankinara in west bengal | पश्चिम बंगालमधल्या कांकीनारामध्ये गावठी बॉम्बचा हल्ला, दोघांचा मृत्यू, चार जण जखमी

पश्चिम बंगालमधल्या कांकीनारामध्ये गावठी बॉम्बचा हल्ला, दोघांचा मृत्यू, चार जण जखमी

कांकीनाराः पश्चिम बंगालमधल्या कांकीनारा भागात गावठी बॉम्बच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी आहेत. मोहम्मद मुख्तार (68) ही व्यक्ती या हल्ल्यात गंभीर जखमी झाली असून, तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, 24 परगणा जिल्ह्यातील काकीनारा भागात बरुईपाला येथे मृत मोहम्मद मुख्यार आणि त्याचा परिवार, तसेच शेजारी घराबाहेर बसले होते. त्याचदरम्यान कोणी तरी बॉम्ब फेकला.

या बॉम्ब हल्ल्यात मुख्तारची पत्नी आणि अनेक लोक गंभीररीत्या जखमी झाले. गेल्या महिन्यात लोकसभा निवडणुकीदरम्यानही अशाच प्रकारची हिंसा झाली होती.  पश्चिम बंगालमध्ये गेल्या काही महिन्यांपासून हिंसाचार उफाळला आहे. इथे मोठ्या प्रमाणात भाजपा आणि टीएमसीच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी होत असते आणि दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते यात जिवानिशी जात आहेत. तर या दोन्ही पक्षांचे नेतेही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत सुटले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक कार्यकर्त्यांची हत्या झाली होती. कार्यकर्त्यांच्या हत्येनंतर त्यांच्या अंत्यसंस्कारावरून शनिवारी भाजपाचे स्थानिक नेते आणि पोलिसांमध्ये वाद झाला होता. तसेच रविवारी अंत्यसंस्कारासाठी बशीरहाट येथील पक्ष कार्यालयात नेण्यात येणारे भाजपा कार्यकर्त्यांचे मृतदेह मध्येच अडवण्यात आले होते. त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी रस्त्यातच या दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची तयारी केली होती.


पोलिसांवर मनमानी केल्याचा आरोप भाजपाने केला आहे. तसेच सोमवारी (10 जून) भाजपाच्या वतीने बशीरहाटसह संपूर्ण बंगालमध्ये 12 तासांचा बंद पुकारण्यात आला. भाजपा हा दिवस काळा दिवस म्हणून पाळला. भाजपाचे नेता राहुल सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'राज्य सरकारच्या मनमानी विरोधात सोमवारी बशीरहाटमध्ये 12 तासांचा बंद पुकारण्यात आला होता. तसेच भाजपा संपूर्ण राज्यात काळा दिवस पाळला आहे.'

पश्चिम बंगालमध्ये भाजपा व टीएमसी कार्यकर्त्यांमधील वाद वाढत आहे. शनिवारी परगना जिल्ह्यामध्ये पार्टीचे झेंडे काढून फेकल्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. या घटनेनंतर तृणमुल काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपाच्या पाच कार्यकर्त्यांची गोळ्या घालून हत्या केली असल्याचा भाजपाकडून दावा करण्यात आला आहे. तर 18 जण बेपत्ता असल्याचेही सांगण्यात आले आहे. तर तृणमुल काँग्रेसनेही त्यांच्या तीन कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आल्याचं म्हटलं आहे. पश्चिम बंगालच्या कूचबिहारमध्ये तृणमूल काँग्रेसच्या आणखी एका कार्यकर्त्याची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. कुचबिहारमधील पेटला बाजारा परिसरात बुधवारी (5 जून) एका कार्यकर्त्याची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली. अजीजूर रहमान असं हत्या झालेल्या कार्यकर्त्याचं नाव आहे. तसेच भाजपाने ही हत्या केल्याचा गंभीर आरोप तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला होता. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचे आमदार सत्यजित बिश्वास यांची काही दिवसांपूर्वी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी एफआयआर दाखल केलं असून, दोन आरोपींना अटक केली आहे. 

Web Title: one man died in crude bomb attack at kankinara in west bengal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.