कधीकाळी होती तिची दहशत, आता लक्ष्मीच्या आत्मसमर्पणानंतर नक्षलमुक्त झालं हे राज्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 18:22 IST2025-02-02T18:22:21+5:302025-02-02T18:22:56+5:30
Naxalite In Karnataka: एकेकाळी तिच्या एका गर्जनेमुळे नक्षलवाद्यांमध्ये जोश संचारायचा. तिच्या एका आदेशावर नक्षलवादी लढायला तयार व्हायचे. त्यामुळे तिच्या नावाची दहशत निर्माण झाली होती. मात्र अनेक वर्षे सरकार आणि सुरक्षा दलांना आव्हान देणाऱ्या या महिला नक्षलवाद्याने अखेर शस्त्र खाली ठेवत आत्मसमर्पण केलं आहे.

कधीकाळी होती तिची दहशत, आता लक्ष्मीच्या आत्मसमर्पणानंतर नक्षलमुक्त झालं हे राज्य
एकेकाळी तिच्या एका गर्जनेमुळे नक्षलवाद्यांमध्ये जोश संचारायचा. तिच्या एका आदेशावर नक्षलवादी लढायला तयार व्हायचे. त्यामुळे तिच्या नावाची दहशत निर्माण झाली होती. मात्र अनेक वर्षे सरकार आणि सुरक्षा दलांना आव्हान देणाऱ्या या महिला नक्षलवाद्याने अखेर शस्त्र खाली ठेवत आत्मसमर्पण केलं आहे. लक्ष्मी असं या महिला नक्षलवाद्याचं नाव असून, तिच्या आत्मसमर्पणानंतर आता कर्नाटक हे राज्य नक्षलवादमुक्त झालं आहे, असं मानण्यात येत आहे.
कर्नाटकमधील शेवटची सक्रिय नक्षलवादी असलेल्या लक्ष्मी हिने उडुपी येथे पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. उडुपीच्या उपायुक्त विद्या कुमारी आणि पोलीस अधीक्षक अरुण केके यांच्यासमोर रविवारी तिने बिनशर्त आत्मसमर्पण केलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लक्ष्मी ही आंध्र प्रदेशमध्ये लपलेली होती. तसेच तिच्याविरोधात उडुपी जिल्ह्यातील कुंदापूर तालुक्यातील अमासेबेल आणि शंकरनारायण पोलीस ठाण्यांमध्ये तीन गुन्हे नोंदवलेले आहेत. हे गुन्हे २००७-२००८ या काळात नोंदवलेले होते. त्यामध्ये पोलिसांसोबत चकमक, हल्ला करणे आणि गाव आणि शहरांमध्ये माओवादी साहित्य सामुग्री पोहोचवण्याशी संबंधित गुन्ह्यांचा समावेश आहे.
लक्ष्मी ही मूळची कुंडापुरा तालुक्यातील चच्चात्तू गावातील थोम्बाटटू येथील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जेव्हा ती आत्मसमर्पण करण्यासाठी पोहोचली तेव्हा तिच्यासोबत राज्यामधील नक्षलवादी आत्मसमर्पण समितीचा सदस्य श्रीपाल आणि तिचा पती सलीम हे उपस्थित होते.
सलीम हा एक माजी नक्षलवादी आहे. त्याने २०२० मध्ये आंध्र प्रदेशमध्ये आत्मसमर्पणक केलं होतं. पंधरा वर्षांपूर्वी कुटुंबाशी संबंध तोडल्यानंतर लक्ष्मी ही भूमिगत झाली होती. तसेच ती चिकमंगळूर आणि उडुपी जिल्ह्यात नक्षली अजेंडा पुढे रेटण्यामध्ये ती सक्रिय होती.