भाडे नाकारणाऱ्या ओला, उबर चालकांना होणार 25 हजार रुपयांचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2018 11:12 IST2018-09-29T11:12:31+5:302018-09-29T11:12:51+5:30
मोबाइल अॅपच्या माध्यमातून तुम्ही ओला किंवा उबर टॅक्सी बुक करता. परंतु ब-याचदा ते चालक येण्यास नकार देतात.

भाडे नाकारणाऱ्या ओला, उबर चालकांना होणार 25 हजार रुपयांचा दंड
नवी दिल्ली- मोबाइल अॅपच्या माध्यमातून तुम्ही ओला किंवा उबर टॅक्सी बुक करता. परंतु ब-याचदा ते चालक येण्यास नकार देतात. राजधानीत असे प्रकार सर्रास घडत असल्यानं नागरिकांना या ओला, उबरचालकांच्या मनमानीचा सामना करावा लागतोय. त्यातून नागरिकांना दिलासा देण्यासाठी दिल्ली सरकारनं एक नवीन धोरण बनवलं आहे. जर तुम्ही ओला किंवा उबर टॅक्सी बुक केली आहे आणि ऐन वेळी चालकानं घटनास्थळी येण्यास नकार दिला. तर त्याला 25 हजार रुपयांपर्यंतचा दंड होणार आहे.
दिल्ली सरकारनं यासाठी नवं धोरण तयार केलं असून, लवकरच त्याला मान्यता मिळण्याची शक्यता आहे. या धोरणाच्या मसुद्यात भरमसाट भाड्यावर नियंत्रण आणि सुरक्षा मानकांना मजबूत करण्याचाही प्रस्ताव आहे. तसेच एखाद्या प्रवाशानं कॅबमध्ये छेडछाड झाल्याचा प्रकाराची तक्रार केल्यास त्या कंपनीला चालकाविरोदात पोलिसांमध्ये गुन्हा नोंदवावा लागणार आहे. जर कंपनीनं असं केलं नाही, तर कंपनीला 1 लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावण्याची तरतूदही या धोरणात करण्यात आली आहे.
या धोरणाचा मसुदा 2017मध्ये बांधकाम मंत्री सतेंद्र जैन यांच्या नेतृत्वात तयार करण्यात आला आहे. लवकरच हा मसुद्याला दिल्ली मंत्रिमंडळाची मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. दिल्ली वाहतूक शाखेच्या एका अधिका-यानं सांगितलं की, दिल्लीत सध्या कॅब सेवा हे वाहतुकीचं महत्त्वाचं साधन झालं आहे. बरेच ग्राहक अॅपच्या माध्यमातून कॅब बुक करत असतात. त्यासाठीच ही नियमावली बनवण्यात आली आहे. तसेच यासाठी ओला, उबर चालकांना दिल्ली सरकारकडून परवाना घ्यावा लागणार आहे.