बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 17:24 IST2025-11-11T17:23:49+5:302025-11-11T17:24:22+5:30
या नशिबवान विजेत्याचा शोध घेण्याची वेळ आता लॉटरी विक्रेत्यावर आली आहे.

बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
पंजाबमध्ये सध्या मोठ्या रकमेची लॉटरी लागल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. एकीकडे ११ कोटींची लॉटरी जिंकलेला विजेता समोर आल्यानंतर मोठा जल्लोष झाला. मात्र, आता १ कोटी जिंकणाऱ्या व्यक्तीला शोधण्यासाठी लॉटरी कंपनीच्या नकीनऊ आले आहेत. या नशिबवान विजेत्याचा शोध घेण्याची वेळ आता लॉटरी विक्रेत्यावर आली आहे. पंजाबमधील लुधियाना शहरात सध्या याच 'बेवारस' विजेत्याला शोधण्यासाठी ढोल-ताशांच्या गजरात एक अनोखी शोधमोहीम सुरू आहे.
नाव-नंबर नाही दिला, आता ओळख पटवणं झालं आव्हान!
लुधियानामधील 'ओमकार लॉटरी' नावाच्या दुकानातून हे तिकीट विकले गेले. दुकान मालकाने दिलेल्या माहितीनुसार, लॉटरीचा क्रमांक ७५६५ लागला आहे, पण तिकीट काढणारी व्यक्ती अजूनही समोर आलेली नाही. सर्वात मोठी अडचण ही आहे की, तिकीट खरेदी करताना त्या व्यक्तीने आपले नाव किंवा संपर्क क्रमांक देण्यास स्पष्टपणे नकार दिला होता. यामुळे आता त्याची ओळख पटवणे दुकान मालकासाठी मोठे आव्हान बनले आहे.
लॉटरी कंपनीने शहराच्या गल्लीबोळात दवंडी पिटण्यास सुरुवात केली आहे, जेणेकरून हा कोट्यधीश विजेता लवकरात लवकर समोर येईल.
केवळ एक महिन्याचा कालावधी
लॉटरी विक्रेत्याने चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की, हे बक्षीस लागून काही आठवडे उलटले आहेत. नियमांनुसार, विजेत्याला आपल्या बक्षीसावर दावा करण्यासाठी फक्त एक महिन्याची मुदत असते. जर ठरलेल्या वेळेत विजेता समोर आला नाही, तर हे एक कोटी रुपयांचे बक्षीस कायमचे रद्द होईल आणि ही रक्कम इतर कोणालाही मिळणार नाही.
विक्रेत्याने लोकांना भावनिक आवाहन केले आहे की, ज्याच्याकडे ७५६५ क्रमांकाचे तिकीट आहे, त्याने लगेच आमच्याशी संपर्क साधावा. सध्या लुधियाना शहरात हाच विषय चर्चेत आहे की, अखेर तो कोट्यधीश नशिबवान माणूस कोण आहे, ज्याच्या हातात १ कोटींचे तिकीट असूनही त्याला याची कल्पना आहे. येत्या काही दिवसांत विजेता समोर न आल्यास त्याचे बक्षीस रद्द होऊ शकते.