योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात फेसबूक पोस्ट टाकणा-या महिलेविरोधात गुन्हा
By Admin | Updated: March 22, 2017 17:55 IST2017-03-22T17:46:46+5:302017-03-22T17:55:12+5:30
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात फेसबूकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणा-या महिलेविरोधात पोलिसांनी फौजदारी गुन्हा दाखल केला आहे

योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात फेसबूक पोस्ट टाकणा-या महिलेविरोधात गुन्हा
>ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. 22 - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात फेसबूकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणा-या महिलेविरोधात पोलिसांनी फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. भाजपा युवा मोर्चाच्या सदस्यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी एफआयआर दाखल केल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त एस रवी यांनी दिली आहे. भाजपा युवा मोर्चाने आपल्या तक्रारीत योगी आदित्यनाथ यांची बदनामी करण्याच्या हेतूने महिलेने सोशल मीडियावर अश्लील आणि मॉर्फ केलेले फोटो अपलोड केल्याचा आरोप केला आहे.
पोलिसांनी हेतूस्पर बदनामी, धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप महिलेवर ठेवले आहेत. भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष सप्तगिरी गौडा यांनी 'महिलेने फेसबूकवर टाकलेले फोटो प्रथमदर्शिनी पाहता एडिट आणि मॉर्फ केले असल्याचं दिसत आहे', असं सांगितलं आहे. या फोटोंमधून आदित्यनाथ यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचं ते बोलले आहेत.
'या महिलेला आपल्या या कृत्यामुळे सामाजिक शांतता भंग होण्याची पुर्ण कल्पना असतानाही तिने हे फोटो अपलोड केल्याचं', सप्तगिरी गौडा यांचं म्हणणं आहे. 'या फेसबूक पोस्टमुळे कायद्याचं उल्लंघन झालं असून त्यासाठी शिक्षेची तरतूद असल्याचं', ते बोलले आहेत.
'अशा पोस्ट शेअर करण्याची या महिलेला सवय लागली असून अशा अफवा ती पसरवत असते', असा आरोप गौडा यांनी केली आहे. 'याआधीही तिने फेसबूक पोस्टच्या माध्यमातून शांतता भंग करत वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचा', दावा गौडा यांनी केला आहे. याआधीही अशा गुन्ह्यांसाठी तिच्यावर एफआयर दाखल झाल्याचं गौडा यांनी सांगितलं आहे.