घरावर छापा पडल्यावर कुटुंबासह लपून राहिला इंजिनिअर; पैशांची बॅग खिडकीबाहेर फेकली पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 13:25 IST2025-08-02T13:22:07+5:302025-08-02T13:25:54+5:30

बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणात ओडिशामध्ये दक्षता विभागाने एका सहाय्यक अभियंत्याला अटक केली आहे.

Odisha Vigilance Department arrests Assistant Engineer Ashok Kumar Panda in disproportionate assets case | घरावर छापा पडल्यावर कुटुंबासह लपून राहिला इंजिनिअर; पैशांची बॅग खिडकीबाहेर फेकली पण...

घरावर छापा पडल्यावर कुटुंबासह लपून राहिला इंजिनिअर; पैशांची बॅग खिडकीबाहेर फेकली पण...

Odisha Engineer Raid: ओडिशामध्ये एका अधिकाऱ्याच्या घरावर टाकण्यात आलेल्या धाडीत कोट्यवधी रुपयांची मालमत्ता उघडकीस आली आहे. भुवनेश्वरमधील रस्ते आणि इमारती विभागाचे सहाय्यक अभियंता अशोक कुमार पांडा याच्यावरील कारवाईत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे समोर आलं. अशोक कुमार पांडा आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांकडे दिल्लीत सात फ्लॅट आणि डीएलएफ सायबर सिटीमध्ये एक दुकान असल्याचे आढळून आले आहे. याशिवाय, त्यांच्याकडे डुमडुमा येथे ८,५०० चौरस फूट क्षेत्रफळावर पसरलेली चार मजली इमारत, डुमडुमा हाऊसिंग बोर्ड कॉलनीमध्ये एक इमारत आणि अठागढमध्ये एक भूखंड असल्याचे आढळून आले. दुसरीकडे त्यांच्यावरील ही कारवाई होत असताना अधिकाऱ्याने खिडकीतून पैसे फेकण्याचा प्रयत्न केला होता.

चौकशीची सुरुवात राजा किशोर जेना यांच्याकरुन झाली होती. तपासादरम्यान, असे आढळून आले की जेना आणि त्यांचे सहकारी अशोक कुमार पांडा यांनी संयुक्तपणे भुवनेश्वरमधील खंडागिरी येथील कॉस्मोपोलिस अपार्टमेंटच्या १६ व्या मजल्यावर ४-बीएचके फ्लॅट खरेदी केला होता. ही मालमत्ता त्यांच्या पत्नींच्या नावावर  होती. त्यामुळे अधिकाऱ्यांनी पांडाच्या मालमत्तेची चौकशी सुरू केली होती. २८ जुलै रोजी, दक्षता पथकाने राजा किशोर जेना आणि अशोक कुमार पांडा यांच्या  मालकीच्या फ्लॅटवर धाड टाकली. अधिकाऱ्यांना दरवाजा बाहेरून बंद आढळला आणि त्यांनी पांडा यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा फोन बंद होता.

त्यानंतर रात्री उशिरा, जेव्हा दक्षता पथक फ्लॅट सील करण्यासाठी परतले तेव्हा त्यांना कळलं की पांडा त्याच्या पत्नी आणि मुलीसह फ्लॅटमध्ये आहे. शोध मोहीम टाळण्यासाठी त्याने बाहेरून दरवाजा बंद केला होता. त्यानंतर पांडा बाहेर आला आणि फ्लॅटची झडती घेण्यात आली. छाप्यादरम्यान, अधिकाऱ्यांना फ्लॅटच्या बाहेर खिडकीतून लटकलेली एक बॅग आढळली. ही बॅग जप्त केली तेव्हा त्यात १ लाख रुपये रोख, कागदपत्रे आणि इतर वस्तू आढळून आल्या. बॅगेत सुमारे १० ग्रॅम वजनाचे चांदीचे नाणे, सुमारे ६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, जमिनीच्या मालकीचे रेकॉर्ड, एक अ‍ॅपल आयफोन, वाहनाची चावी आणि बरेच काही होते.

पांडा १३ एप्रिल २००७ रोजी ५,००० पगारासह कनिष्ठ अभियंता म्हणून सेवेत रुजू झाला होता. १२ एप्रिल २०१३ रोजी त्यांची सेवा कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) म्हणून नियमित करण्यात आली. २०१४ ते २०२० दरम्यान त्यांनी विविध कार्यालयांमध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून काम केले. १ डिसेंबर २०२० रोजी पांडा यांना सहाय्यक अभियंता पदावर बढती देण्यात आली आणि भुवनेश्वरमधील आर अँड बी विभागामध्ये नियुक्ती करण्यात आली. सध्या त्याला दरमहा ७९,००० रुपये पगार मिळत आहे.

Web Title: Odisha Vigilance Department arrests Assistant Engineer Ashok Kumar Panda in disproportionate assets case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.